गडनदी धरणग्रस्तांचा मुलभूत समस्यांशी सामना
By admin | Published: January 20, 2016 11:56 PM2016-01-20T23:56:37+5:302016-01-21T00:29:28+5:30
कुचांबेवासीय त्रस्त : सूर्यकांत साळुंखे करणार बेमुदत उपोषण
देवरूख : कुचांबे येथे उभारण्यात येत असलेल्या गडनदी प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांनी सर्वतोपरी सहकार्य करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील धरणग्रस्तांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा १ फेब्रुुवारीपासून सूर्यकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पाटबंधारे विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा राजीवली, कुटगिरी, रातांबी धरणग्रस्त ग्रामस्थ समितीने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मौजे कुचांबे येथे जलसंपदा विभागातर्फे गडनदी प्रकल्पाचे काम गेली ३० वर्षे सुरू आहे. आज धरणाचे काम १०० टक्के पूर्ण होत आले आहे तरीही प्रकल्पग्रस्तांची फरफट मात्र सुरूच आहे. शासन नियमानुसार आधी पुनर्वसन मग धरण, या उक्तीला हरताळ फासत पाटबंधारे विभागाने आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. याचा नाहक फटका प्रकल्पग्रस्तांना बसत आहे.
याबाबत वारंवार प्रशासन आणि शासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने साळुंखे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आगामी काळात धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह परिसरातील सोयीसुविधांचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनामध्ये शिर्केवाडी पुनर्वसन रस्ता पूर्ण करावा, शिर्केवाडी, घाडगेवाडी गावठाणातील अपूर्ण सुविधा पूर्ण कराव्यात, राजीवली काळंबेवाडीतील सुविधांची पूर्तता व्हावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांबरोबरच काळंबेवाडीतील घरांचा मोबदला अदा करण्यात यावा, ग्रामस्थांचे भुखंड सातबारे देण्यात यावेत, शिर्केवाडी पुनर्वसनात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शिर्केवाडीतील वीज जोडणीत बदल करून मिळावा, घाडगेवाडीतील निकृष्ठ कामे सुधारावी, कुटगिरी, कदमवाडी, निकमवाडी, बौध्दवाडी ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, घाडगेवाडी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व्हावे, रस्त्याचे खोदकाम करून माती टाकून नुकसान झालेल्या शेतजमिनींचा मोबदला मिळावा, घाडगेवाडी पोच रस्त्याजवळ संरक्षक भिंंत बांधून मिळावी, स्वेच्छा पुनर्वसन धरणग्रस्तांचे शासकीय अनुदान त्वरित मिळावे, प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता मिळावा, धरणग्रस्तांना अंत्योदय रेशनकार्ड मिळावे, रिंगरोडचे काम पूर्ण करावे, राजीवली - येडगेवाडी - कावळटेक रस्ता तयार करावा, राजीवली काळंबेवाडीतील शाळेवर नियमानुसार स्लॅब टाकून मिळावा, भूमिहिन धरणग्रस्तांना जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या धरणग्रस्त ग्रामस्थ समितीने दिला आहे. (प्रतिनिधी)
मागण्या मान्य करा...
मागण्यांची पाटबंधारे व पुनर्वसन खाते यांनी पूर्तता करावी आणि त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करावी. अन्यथा १ फेब्रुवारीपासुन सूर्यकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली लघु पाटबंधारे विभाग, चिपळूणच्या आवारातच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरी सुविधांचा अभाव
या क्षेत्रातील राजीवली, रातांबी, पाचांबे, कुटगिरी आदी गावातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, आजही त्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे. याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार आंदोलने, उपोषण, मोर्चे काढूनही याकडे लक्ष दिले जात नाही.