मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीबाबत संभ्रम; तांत्रिक अडचण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:26 AM2022-06-01T07:26:08+5:302022-06-01T07:26:13+5:30
ओसरगाव, राजापूर, हातिवले टोल नाके आज सुरू होणार?
सिंधुदुर्ग : मुंबई- गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, हातिवले येथील टोल नाके अखेर बुधवारपासून (१ जून) सुरू करण्यात येणार आहेत. या बाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. ओसरगावसोबत राजापूर- हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार आहे.
दरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरू करू नका, असे अनेकांनी म्हटले होते. टोल सुरू केला तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश काम बाकी
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले टोल नाका परिसरातील काम वगळता इतर बहुतांश काम अपुरे आहे. त्यामुळे तूर्तास टोल सुरू करू नये, यावरून राजकारणही तापले आहे. टोल नाका सुरू होत असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
भाजपने दिला टोल नाका फोडण्याचा इशारा
दरम्यान, भाजपचे कणकवलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेत, टोलमधून एमएच ०७
म्हणजे सिंधुदुर्ग पासिंगमधील सर्व गाड्यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, ही मागणी पूर्ण न केल्यास टोल नाका फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
टोल सुरू कराल तर शिवसेनेशी गाठ : वैभव नाईक
मुंबई- गोवा महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. सिंधुदुर्गवासीयांना टोल माफी झालेली नाही, लोकांच्या मागण्यादेखील प्रलंबित आहेत. असे असतानादेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जूनपासून टोल सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. याला नागरिकांचा विरोध असून, जर १ जूनपासून टोल सुरू कराल, तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.