काँगे्रसने आंदोलन छेडले
By admin | Published: January 19, 2015 11:25 PM2015-01-19T23:25:23+5:302015-01-20T00:08:02+5:30
शासनविरोधी : विविध घोषणांनी जिल्हाधिकारी भवन दणाणले
सिंधुदुर्गनगरी : आम आदमी जिंदाबाद - नवीन युती सरकार मुर्दाबाद या व अशा अनेक शासनविरोधी घोषणा देत जिल्ह्यातील प्रलंबित भात खरेदी, हत्ती नुकसान, प्रलंबित शेतीपंप जोडणी आणि समस्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भवनासमोर धरणे आंदोलन छेडले. आंदोलनाला शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघाच्या गोदामात ३० हजार क्विंटल भात पडून आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी पिकविलेले भात शासनाने खरेदी केलेले नाही. सन २०१३-१४ मध्ये खरेदी केलेले ३० हजार क्विंटल भातही गोदामात पडून आहे. यावर्षी शासनाकडून नवीन भात खरेदीसाठी आदेश नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या विषयात काँग्रेसने लक्ष वेधले होते. शासनाकडून भात खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना खासगी दलालांकडे धाव घ्यावी लागत आहे व खासगी दलालांकडे मिळणाऱ्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची तफावत आहे. तरी शासनाने त्वरीत भात खरेदीचे आदेश द्यावेत व क्विंटलला २४०० रुपये दर मिळावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
रानटी हत्तींकडून येथील शेतकऱ्यांच्या बागायतींचे नुकसान होत आहे. याबाबत शासनाने लक्ष घालावे व हत्तींना हटवावे. जिल्ह्यातील १५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेतीपंप कनेक्शनची मागणी केलेली आहे. त्यासाठी लागणारे डिपॉझिटही शेतकऱ्यांनी भरणा केलेले आहे. असे असूनही शेतीपंपाचे कनेक्शन अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या होत असलेल्या पीक नुकसानीला शासन जबाबदार आहे.
ग्रामीण भागात २००९ नंतर ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या घरांना अन्यायकारक दंड लागू करण्यात आला आहे. तो दंड त्वरीत रद्द करावा. अवकाळी पावसाने झालेल्या आंबा, काजू नुकसानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेती रक्षणार्थ शस्त्र परवाना मिळताना विशेषत: वारसांच्या नावे शस्त्र परवान्याची पुर्ननोंदणी होताना अनेक अडचणी येतात. त्यात सुलभता यावी अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्वरीत न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन छेडले.
या धरणे आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, स्नेहलता चोरगे, अशोक सावंत, संदीप मेस्त्री, बाळा गावडे, जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, अस्मिता बांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची भेट घेत काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)
आंदोलन सुरुच ठेवणार : नीतेश राणे
शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेसने आवाज उठवायला सुरुवात केली असून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरुच राहणार आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी आंदोलनासाठी तयार रहा, असे आवाहनही यावेळी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केले.