काँग्रेसचा शासनाविरोधी एल्गार
By admin | Published: February 11, 2016 10:32 PM2016-02-11T22:32:54+5:302016-02-11T23:47:34+5:30
राजापूर तालुका : केंद्र, शासनाच्या धोरणाचा करणार निषेध
राजापूर : केवळ आश्वासने देऊन केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेली भाजपप्रणित शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली असल्याचा आरोप करीत शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारीला राजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.दीड वर्षाहून अधिक काळ केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्न दाखवली होती. पण, प्रत्यक्षात ही दोन्ही सरकारे सर्वच क्षेत्रात निष्प्रभ ठरली आहेत. त्याचा फटका गोरगरीब जनतेसह शेतकरी, कामगार यांच्यासह सर्वच क्षेत्राला बसला आहे. शासनाने सर्व जनतेची घोर फसवणूक केली आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.काँग्रेस राजवटीत रेशनवर मिळणारे धान्य या सरकारने बंद करून टाकले. महागाई तिपटीने वाढली आहे. घरबांधणी व दुरुस्तीच्या अधिकारात हस्तक्षेप झाल्याने आता परवानगीसाठी जाचक अटी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट सुरु झाली आहे. एस. टी.सह रेल्वेप्रवास दरात झालेली वाढ, वाढविलेली भरमसाठ घरपट्टी, गौण खनिजाबाबत लादलेल्या जाचक अटी अशा विविध मुद्द्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात माजी खासदार नीलेश राणे, विधानपरिषद सदस्य अॅड. हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, ज्येष्ठ नेते राजन देसाई यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चा सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाईल. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
आंदोलन : सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न...
वाढती महागाई, सामान्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने घेतलेले वादग्रस्त निर्णय, रेशनवरून गायब झालेले धान्य अशा विविध प्रश्नावर शासनाला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी अशी आंदोलने करण्यात येत आहेत. २६ जानेवारी रोजी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले होते.
राष्ट्रवादीचं काय?
केंद्रातील व राज्यातील सरकारच्या कारभाराविरोधात तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले असतानाच काँग्रेसचा तालुक्यात कधी - कधी मित्रपक्षाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.