काँग्रेस-सेना कार्यकर्ते भिडले
By admin | Published: June 6, 2015 12:07 AM2015-06-06T00:07:56+5:302015-06-06T00:24:21+5:30
दोडामार्ग आमसभा वादळी : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद मिटला
दोडामार्ग : तळकट येथील सीताबाई सावंत या वयोवृद्ध महिलेस मारहाण करणारा तिचा मुलगा अनंत सावंत याला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी पाठीशी घालत असून, त्यांच्या निषेधाचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी काँगे्रसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी सभागृहात करताच काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
सभागृहातील वातावरण तणावग्रस्त झाले. आमसभेत दोन्ही कार्यकर्त्यांत राडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवून हस्तक्षेप करीत दोन्हीकडील कार्यकर्त्यांना पांगविल्यावर पुन्हा आमसभा सुरळीत सुरू झाली. वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ते मंत्री झाल्यानंतर प्रथमच दोडामार्ग तालुक्याची आमसभा येथील महालक्ष्मी सभागृहात शुक्रवारी पार पडली. यावेळी पंचायत समिती सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, पंचायत समिती सदस्य विशाखा देसाई, सुचिता दळवी, जनार्दन गोरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, आदी उपस्थित होते.
आमसभेचा पूर्वार्ध समाप्त होताच विभागवार आढावा सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी तळकट येथील सीताबाई सावंत या वयोवृद्ध महिलेस झालेल्या मारहाणीचा विषय हाती घेतला. स्वत:च्या ७० वर्षीय आईस तिचाच मुलगा अनंत सावंत याने कोयत्याने हल्ला करून मारहाण केली. या घटनेचा दोडामार्ग तालुक्यात सर्वच स्तरातून निषेध झाला. मात्र, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी हे आरोपी अनंत सावंत याला स्वत:च्या गाडीत घालून फिरवित होते. एका संशयित आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रकार धुरी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी एकनाथ नाडकर्णी यांनी केली. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांचा अंगावर धावून जाण्याचा प्रकार
संतापलेले सेना कार्यकर्ते सभागृहात गोंधळ घालत काँग्रेस कार्यकर्त्यांवर धावून गेले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व सेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले. समाज कल्याणसभापती अंकुश जाधव, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, रमेश दळवी, प्रेमानंद देसाई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, सज्जन धाऊसकर, जीवन सावंत, संजय देसाई, गणेशप्रसाद गवस, रामदास मेस्त्री, पांडुरंग नाईक यांच्यात झटापट झाली. प्रकरण हातघाईवर आल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पांगविले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. त्यानंतर आमसभा पुन्हा सुरू झाली.