काँग्रेसने जाब विचारला
By admin | Published: February 18, 2015 10:32 PM2015-02-18T22:32:00+5:302015-02-18T23:50:29+5:30
नळयोजनेची अवाजवी देयके : तरंदळेचे ८४ हजार, वरवडेचे ४५ हजार
कणकवली : तालुक्यातील तरंदळे येथील नळयोजनेच्या पंपाचे जानेवारी महिन्याचे वीज देयक तब्बल ८४ हजार इतके काढण्यात आले आहे. तर वरवडे ग्रामपंचायतीचे वीज देयक ४५ हजार रूपये आले आहे. वीज देयकात अचानक अवाजवी वाढ झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विभागीय अभियंता सतीश माने यांना जाब विचारला. चुकीची देयके आली असल्यास कमी करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तरंदळेतील नळयोजनेचे सरासरी अडीच हजार रूपयांपर्यंत वीज देयक येत होते. वरवडेतील नळयोजनेचेही सर्वसाधारण याच प्रमाणात वीज देयक येत होते. मात्र, जानेवारी महिन्यातील वीज देयकांमध्ये अवाजवी वाढ झाली. याबाबत कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वीज वितरणच्या विभागीय अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी पंचायत समिती सदस्य महेश गुरव, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश सावंत, वरवडे उपसरपंच आनंद घाडिगांवकर, संतोष चव्हाण, माजी सभापती सुभाष सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मानेंचे आश्वासन
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन नळयोजनांच्या पंपाचे दिवसाचे रिडींग जाऊन पहा. अशी अवाजवी देयके कशी काय काढली जातात? असा प्रश्न सहाय्यक अभियंता संजय नहाटे यांना विचारला. मीटर नादुरूस्त असल्यास चुकीचे देयक येऊ शकते. मीटर तपासून घेण्याची आवश्यकता आहे. अवाजवी वाढीव देयके आल्यास वीज वितरणशी संपर्क साधावा. चुकीची देयके दुरूस्त करून दिली जातील, असे आश्वासन सतीश माने यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.