काँग्रेसकडून मंजुरी, युती करून स्थगिती
By Admin | Published: May 19, 2016 11:25 PM2016-05-19T23:25:45+5:302016-05-19T23:58:16+5:30
पंचायत समिती इमारतीचे भीजत घोंगडे : दोन कोटीचा निधी परत जाण्याची भीती
अनंत जाधव -सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीला काँग्रेसच्या काळात मंजुरी मिळाली. तसेच शहरातील भटवाडी येथे येथील जागाही निवडण्यात आली. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या जागेला खो घालत पंचायत समिती इमारत प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्याचे ठरवले. मात्र अद्याप या इमारतीला मंजुरी मिळाली नसल्याने नवीन पंचायत समितीच्या इमारतीचे भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे पंचायत समिती इमारत कुठेही करा पण एकदा करा, अशी मागणी सभापती प्रमोद सावंत यांनी लावून धरली असून मंजूर दोन कोटीचा निधी परत जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
सावंतवाडी पंचायत समिती इमारत येथील सालईवाडा भागात आहे. मात्र ही इमारतीची जागा अपुरी असल्याने अनेक वर्षापासून पंचायत समितीची इमारत नव्या जागेत व्हावी, अशी मागणी होती. तसा प्रस्ताव पंचायत समितीने राज्य सरकारला पाठवला होता. त्याला तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सहाय्य केल्याने या जागेला मंजुरी मिळाली. तसेच २ कोटीचा निधी ही मंजूर झाला होता. या इमारतीसाठी भटवाडी येथे असलेली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची ३७ गुंठे जागा सुचवण्यात आली होती. त्या जागेलाही राज्य सरकारच्या स्थापत्य विभागाने मंजूरी दिली. त्यामुळे या जागेवर पंचायत समितीची इमारत होणार यावर शिक्कामोर्तबही झाले होते. पण राज्यात काँग्रेसचे सरकार बदलले आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार आले. आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे ग्रामविकास राज्यमंत्री झाले. त्यांनी पंचायत समितीची नूतन इमारत भटवाडी येथे होत होती तिला स्थागिती दिली. तसेच प्रशासनाला नवीन जागा शोधण्याचे आदेश दिले. मात्र प्रशासनापूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनीच प्रांताधिकारी कार्यालयासमोरील जागा सुचवली. मात्र या जागेला अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सभापती प्रमोद सावंत यांनी पाठपुरावा केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोरील जागेचा तिढा सोडवा, अशी सूचना केसरकर यांनी केली. मात्र या बैठकीलाही मुहूर्त मिळत नसल्याने सभापती सावंत यांनीही पाठपुरावा करण्याचे सोडून दिले आहे. पंचायत समितीची जुनी इमारत ही छोटी असून अनेक पंचायत समितीचे अनेक विभाग हे इतरत्र आहेत. तसेच तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ कामानिमित्त पंचायत समितीत येत असतात. त्यावेळी जागेचा प्रश्न येतो म्हणून नव्या इमारतीचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता.
तसेच आहे त्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे शासनाच्या नियमानूसार शक्य होणारे नूसन जुनी इमारत १४ गुंठे जागेत असून पार्किंगसह अन्य विभाग एकत्रित करण्यासाठी अनेक अडचणी येणार असल्याने इतरत्र जागा शोधण्याचा पर्याय सरकारकडून देण्यात आला होता. त्यामुळेच भटवाडीतील जागा शोधण्यात आली होती. २०१२ मध्ये शासनाच्या सर्व मंजूऱ्या घेऊन शेवटच्या टप्प्यात निर्विदे पर्यत आलेल्या प्रस्तावा अखेर नव्या ग्रामविकास राज्यमंत्र्याना खो घालत नवी जागा शोधण्याचे आदेश दिल्याने या पंचायत समितीच्या इमारतीला आणखी किती वर्षांनी मुहूर्त मिळणार याबाबत शंका आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता जाऊन शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्याने आता पंचायत समिती इमारतीची जागाही बदलली असून नव्या इमारती सत्तेच्या राजकारण लवकरात लवकर मुहूर्त मिळावा एवढीच अपेक्षा तालुक्यातील जनता व्यक्त करीत आहे.
प्रमोद सावंत : पालकमंत्र्यांना वेळच नाही
पंचायत समिती इमारत कुठेही करा पण ती करा अशीच अपेक्षा आमची आहे. भटवाडी येथे पंचायत समितीची ३७ गुंठे जागेत इमारत होणार होती. पण त्या जागेला स्थगिती देण्यात आली आणि प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोरच्या जागेला परवानगी देण्यात आली. त्या जागेला लवकरात लवकर मंजुरी मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. यासाठी पालकमंत्र्यानी जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्याचे सांगितले होते. पण या बैठकीला अद्याप मुहूर्त मिळत नाही, असा आरोपही यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती प्रमोद सावंत यांनी केला आहे.