जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार
By admin | Published: February 6, 2015 12:11 AM2015-02-06T00:11:02+5:302015-02-06T00:48:45+5:30
शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत : ओरोस येथील कार्यक्रमात प्रवेश
सिंधुदुर्गनगरी : खासदार विनायक राऊत यांच्या ओरोस येथील जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ््याप्रसंगी काँग्रेसच्या ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, उपसरपंच संजय परब, शिरवलचे काँग्रेस अध्यक्ष भाई पार्सेकर यांच्यासह ओरोस, कसवण, तळवडे, शिवापूरच्या सुमारे दीडशे काँग्रेस- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गुरूवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.एकेकाळी सिंधुदुर्गात वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीचे लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये पानिपत झाल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी शिवसेना- भाजपमध्ये गेले. यामुळे काँग्रेसच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला चांगलाच धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये घुसमटलेल्या काही बड्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना- भाजपचा मार्ग धरला. गेल्या दोन दिवसात काँग्रेस नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक असलेल्या कुडाळचे संजय पडते, वैभववाडीचे जयेंद्र रावराणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरूवारी ओरोस येथे खासदार विनायक राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, उपसरपंच संजय परब यांच्यासह शिरवलचे काँग्रेस अध्यक्ष भाई पार्सेकर, कसवणचे माजी सरपंच सतीश सापळे, ओरोसचे नागेश ओरोसकर, शिवापूरचे संभाजी शेडगे, ओरोस, कसवण, तळवडे, शिवापूरच्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये प्रकाश राणे, बाळा घाडीगावकर, गंगाराम राऊळ, प्रकाश गुरव, उमेश गुरव, भिकाजी राऊळ, संदीप कुडव, योगेश कुडव, उमेश गुंजाळ, नितीन शेडगे, निकेतन शेडगे, पवन शेडगे, सुशांत शेडगे, श्रीकांत शिंदे, अमित शिंदे, अमोल पेडणेकर, नूतन पेडणेकर, विशाल गुंजाळ, समीर गुंजाळ, मंगेश राऊळ, सुनील राऊळ, सुभाष राऊळ, सत्यवान राणे, सचिन गुंजाळ, कनिप गुंजाळ, गुरूनाथ चव्हाण, वैभव शिंदे, विजय गुंजाळ, सिताराम चव्हाण, वैभव कडव, संदीप शिंदे, सतीश चव्हाण, संतोष गुंजाळ, विजय बाग, हेमंत पेडणेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गातून शिवसेना संपविणारे आता संपले आहेत. जिल्हावासीयांचे शिवसेनेवरील प्रेम जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत शिवसेनेला संपविण्याचे स्वप्न कोणी पाहू नये. शिवसेनेत सर्वांनाच मानसन्मान देण्याची परंपरा आहे. तुम्हालाही तो मिळेल. प्रामाणिकपणा हे सेनेचे ब्रिद आहे.
- विनायक राऊत, खासदार
जिल्ह्यातील गेली अनेक वर्षांची दहशत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मोडीत काढण्यात यश आले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची शिवसेनेला गरज आहे. तुमचे सर्वांचे शिवसेनेत स्वागत आहे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री
जिल्हा भगवामय करण्याचा निर्णय
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनेक आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील शिवसेनेला बळ मिळाले आहे. तर काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे. जिल्हा भगवामय होत असून आगामी काळात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, बँका, संस्था काबीज करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.