मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे काँग्रेस घाबरली
By admin | Published: July 23, 2016 11:12 PM2016-07-23T23:12:32+5:302016-07-23T23:47:11+5:30
राजन तेली यांची टीका : हिंमत असेल तर खुलेआम पुतळा जाळा
दोडामार्ग : मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा ठसा कमी वयात आणि कमी कालावधीत उमटविला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्यानेच मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यासारखे भ्याड कृत्य करण्यात आले. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्यात धमक असती, तर खुलेआम हे कृत्य केले असते. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला.
येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष संदीप नाईक, चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला तरूण मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यांनी कमी कार्यकाळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असल्याने काँगे्रस कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रकार केला. हे कृत्य भ्याडपणाचे आहे. त्यांच्यात जर हिंमत असती, तर चोरीछुपे असे कृत्य केले नसते. यापुढे असे प्रकार जिल्ह्यात खपवून घेतले जाणार नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तोंडावर असे कृत्य करणे, घरातून पळून जाणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. जर पुतळा जाळला, तर खुलेआम सांगा. नाहीतर आम्ही हे केले नाही, असे तरी जाहीर करा.
याबाबत पोलिसांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आमचा आणखी काही व्यक्तींवर संशय आहे.
पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांनाही अटक करावी. रविवारपर्यंत जर अटक केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा राजन तेली यांनी दिला. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी अशी प्रवृत्ती जिल्ह्यात
खपवून घेतली जाणार नाही, असे सांगितले.(प्रतिनिधी)