काँग्रेसमुक्त जिल्ह्याची सुरूवात नगरपंचायतीपासून
By admin | Published: October 7, 2015 11:51 PM2015-10-07T23:51:00+5:302015-10-08T00:34:02+5:30
प्रमोद जठार : वैभववाडीतील दत्तमंदिरातून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ
वैभववाडी : देशातून काँग्रेसचे समूळ उच्चाटन केल्यानंतर भ्रष्टाचाराने बरबटलेली राज्यातील सत्ताही उलथवून टाकण्यात महायुतीला यश आले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची सुरुवात वैभववाडी व दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीने करीत आहोत, असे स्पष्ट करीत नगरपंचायतीची निवडणूक ही विकासाची लढाई आहे. त्यामुळे जनतेने महायुतीच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत केले.
शहरातील दत्तमंदिरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर भाजप संपर्क कार्यालयात महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजू शेटये, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड हर्षद गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सावंत, नंदू शिंदे, मंगेश लोके, उत्तम सुतार संजय रावराणे, श्रीराम शिंगरे आदी उपस्थित होते.माजी आमदार जठार म्हणाले, शिवसेना, भाजप आणि आरपीआय एकदिलाने व निर्मळ मनाने नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. आमचे जागावाटप निश्चित झाले आहे. तरीही जे काँग्रेस विरोधी ते आमचे व पर्यायाने जनतेचे असतील. या तत्त्वाने अशा संघटना, पक्ष यांना सामावून घेण्याची महायुतीची तयारी आहे. त्यामुळे जागांची आकडेवारी आमच्यासाठी महत्वाची नाही. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमची बोलणी सुरू राहतील. असे स्पष्ट करीत वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागात महायुती उमेदवार देणार आहे. असे सांगितले.
नगरपंचायतीची निवडणूक ही जनतेच्या विकासासाठी लढली जाणारी लढाई आहे. केंद्रात आणि राज्यात शिवसेना, भाजप व मित्रपक्षांचे सरकार आहे. त्यामुळे नगरोत्थान विभागातून भरपूर निधी शहराच्या विकासासाठी आम्ही आणू शकतो. येथील नागरिकांनी सत्ता महायुतीच्या हाती द्यावी. पुढच्या वर्षभरात १00 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला बळी पडू नका
अनेक वर्षे सत्तेत राहून भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा मतदारांना वाटण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल आणि तो वाटलेला पैसा वसूल करण्यासाठी नगरपंचायत विकायलाही ते कमी करणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला भुलून कोणीही चुकीचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन महायुतीच्यावतीने माजी आमदार प्रमोद जठार यांनी मतदारांना केले आहे.
रणधुमाळीत नेतेमंडळी
नगरपंचायतीच्या सर्व प्रभागात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत फिरुन प्रत्येक मतदाराला आपण व्यक्तीश: भेटणार आहोत. तसेच या रणधुमाळीत भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी महायुतीच्या प्रचारात उतरणार असल्याचे संकेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले.