‘भाजप’ सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा
By admin | Published: May 30, 2016 10:10 PM2016-05-30T22:10:51+5:302016-05-31T00:36:26+5:30
मालवण येथे ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी : भाजपकडून दोन वर्षांत जनतेची फसवणूक
मालवण : भाजप सरकारने दोन वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. देशातील सामान्य नागरिक तसेच गरिबांना वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.
चिपी विमानतळ व सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था करण्याचे काम सरकार करत आहे. याचा निषेध म्हणून मालवण तालुका काँग्रेसतर्फे सोमवारी मालवण तहसील कार्यालयाबाहेर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या दोन वर्षांच्या ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी साजरी करताना केंद्र व राज्यातील भाजप-युती सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, देशात महागाई तसेच इतर जनतेच्या विविध प्रश्नांबाबत नायब तहसीलदार एस. पी. खडपकर यांना निवेदन निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना जमाव करून मोर्चा काढल्याप्रकरणी ३० ते ३५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, मोहन वराडकर, राजा गावडे, उमेश मांजरेकर, संजय लुडबे, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर, उदय परब, बाबू कांदळकर, अनिल न्हिवेकर, राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, चित्रा दळवी, सीमा परुळेकर, भाग्यता वायंगणकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
केणी म्हणाले, भाजप-युती सरकारबाबत जनतेच्या मनात असंतोष आहे. गरीब जनतेला चांगल्या सुविधा देऊ अशी स्वप्नेच जनतेला दाखवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सरकारकडे कोणतेही ‘व्हिजन’ नाही. स्थानिक प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारभार हाकत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी करण्यात आली. (प्रतिनिधी)
खोट्या आश्वासनांबाबत जागृती करणार
जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी, गरीब जनता निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कंटाळली आहे. जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री चिपी विमानतळावर २०१७ ला विमान झेपावणार अशी खोटी आश्वासने देत आहेत. सरकारच्या या धोरणांबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकासाचे धोरण आम्ही पूर्ण करून दाखवू. भविष्यात महागाई कमी न झाल्यास जनतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला.