जिल्ह्यातील काँग्रेस नेते 'मंबाजीबुवा'

By admin | Published: June 30, 2016 10:15 PM2016-06-30T22:15:28+5:302016-06-30T23:55:52+5:30

विनायक राऊत : शिवबंधन पंधरवड्याचा शुभारंभ; जेष्ठांचा सत्कार; काँग्रेसवर टीका

Congress leader 'Mambojibuwa' in district | जिल्ह्यातील काँग्रेस नेते 'मंबाजीबुवा'

जिल्ह्यातील काँग्रेस नेते 'मंबाजीबुवा'

Next

वैभववाडी: काँग्रेसच्या राजवटीत ठेकेदार व पुढा-यांनी पोटं भरली. जिल्ह्यातील काँग्रेस म्हणजे 'मंबाजीबुवा' असून विकास पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे नाही, केवळ रक्तरंजित राजकारण म्हणजे विकास नव्हे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी शिवबंधन पंधरवड्यानिमित्त कोकिसरेतील मेळाव्यात केली.
शिवसेना पक्ष स्थापनेच्या पन्नाशीनिमित्त जिल्हा शिवसेनेतर्फे शिवबंधन पंधरवडा साजरा केला जात असून त्याचा प्रारंभ गुरूवारी जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोरे येथे झाला. त्यानंतर कोकिसरे येथील विभागीय मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, सिध्दीविनियक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, युवासेना जिल्हा प्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, नियोजन समिती सदस्य प्रकाश परब, तालुका संपर्क प्रमुख विठ्ठल बंड, कणकवली संपर्क प्रमुख शंकर पार्सेकर, तालुका प्रमुख अशोक रावराणे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, राजेंद्र राऊत, पंढरीनाथ तावडे, नंदू शिंदे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, श्रीराम शिंगरे आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी भगवा हातात घेतला तो मतांसाठी नव्हे तर हिंदुस्थानच्या रक्षणासाठी! त्यामुळेच ५० वर्षे शिवसेना सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. आम्ही म्हणू तोच विकास ही संकल्पना नारायण राणे यांनी जिल्ह्यात राबवली. परंतु, जिल्हावासियांना हवा तो विकास पालकमंत्री दीपक केसरकर करीत आहेत. राणेंना २५ वर्षाच्या कालखंडात जो सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला विकास जमला नाही. तो पालकमंत्री म्हणून केसरकरांनी दीड वर्षात करुन दाखविला आहे.
ते म्हणाले , दीपक केसरकर पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय खून बंद झाले. राजकीय ठेकेदारीला लगाम लागला. भ्रष्टाचार कमी झाला. नापणे धबधब्याच्या माध्यमातून पंचक्रोशीचा विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच स्वदेस पर्यटन योजनेसाठी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हाची निवड झाली आहे. जिल्ह्यातील वीजेचे प्रश्न पुढच्या तीन महिन्यात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा डौलाने फडकविण्यासाठी जेष्ठांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे.
आमदार नाईक म्हणाले, सिंधुदुर्गात शिवसेना रुजविणा-या वैभववाडीच्या चहूबाजूंना शिवसेनेचे आमदार असताना येथे मात्र, काँग्रेसचा आमदार ही शिवसैनिकांच्या मनातील खंत आहे. यावेळी कोकिसरे विभागातील ५० जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.


हे बंधन आहे; जोखड नव्हे !
वैभववाडी तालुका आणि जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आहे. जिल्ह्याचे सभापतिपद वैभववाडीत आहे. तरीही विकास होत नसेल तर भाकरी परतण्याची वेळ झाली आहे. हे जनतेने लक्षात घ्यावे. आम्ही बांधतोय हे शिव'बंधन' आहे. जोखड नव्हे! त्यामुळे आदराने बांधून घ्या. त्याचप्रमाणे आगामी काळातील परिवर्तनासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तथा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांनी केले.

Web Title: Congress leader 'Mambojibuwa' in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.