काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढणार
By admin | Published: January 19, 2015 11:28 PM2015-01-19T23:28:14+5:302015-01-20T00:55:44+5:30
व्हिक्टर डॉन्टस : १९ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने ही निवडणूक पहिल्यांदाच काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. १९ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जिल्हा बँकेच्या उत्कर्षासाठी निवडणूक एकत्रित लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात माहिती देताना दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा बँक अध्यक्ष डी. बी. वारंग, संचालक सुरेश दळवी, विकास सावंत, गजानन गावडे, अविनाश माणगावकर, आत्माराम ओटवणेकर, गुलाबराव चव्हाण, आरती मर्गज, सुगंधा साटम आदी उपस्थित होते.याबाबत सतीश सावंत म्हणाले, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदतवाढ संपलेली होती. तिला पुन्हा मुदतवाढ मिळाली व ती मुदतवाढही आता संपत आल्याने संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. तसा निर्णयही यावेळी झाला आहे. सात वर्षे जिल्हा बँकेला जो कामाचा दर्जा मिळत आहे तसाच दर्जा यापुढेही राखला जावा, शेतकरी यांचा उद्धार व्हावा, त्यासाठीही संचालक मंडळाची निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारपासून प्रक्रिया सुरू होईल. व्हिक्टर डॉन्टस म्हणाले, जिल्हा बँकेची प्रगती राखण्यासाठी हा निर्णय घेतला. बँकेचे व शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला
आहे. (प्रतिनिधी)