देवगडात काँग्रेसचा ‘रास्ता रोको’

By admin | Published: November 6, 2015 11:24 PM2015-11-06T23:24:32+5:302015-11-06T23:40:34+5:30

पाणी प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष : नीतेश राणे

Congress 'path stop' in Devgad | देवगडात काँग्रेसचा ‘रास्ता रोको’

देवगडात काँग्रेसचा ‘रास्ता रोको’

Next

देवगडात काँग्रेसचा ‘रास्ता रोको’
पाणी प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष : नीतेश राणे
देवगड : देवगड-जामसंडे पाणी प्रश्नासाठी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड-जामसंडे मार्गावर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा; अन्यथा आंदोलन थांबणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार राणे यांनी घेतला. अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी देवगड-जामसंडे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावांचा टंचाई कृती कार्यक्रमांतर्गत प्रपत्र ‘अ’ प्राप्त करून घेऊ, कामांचे त्वरित सर्वेक्षण व अंदाजपत्रक करून जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जामसंडे सांस्कृतिक भवन ते देवगड एस.टी. बसस्थानकापर्यंत मोर्चा काढून बसस्थानकासमोर रास्ता रोेको करण्यात आला. या आंदोलनामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेसच्या महिला आघाडीप्रमुख प्रणिता पाताडे, वित्त बांधकाम सभापती संजय बोंबडी, महिला बालकल्याण सभापती स्रेहलता चोरगे, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, देवगड उपसभापती स्मिता राणे, प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, योगेश चांदोस्कर, माजी सभापती सदानंद देसाई, रवींद्र जोगल, आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रांताधिकारी संतोष भिसे, देवगडचे तहसीलदार जीवन कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठाचे देशमुख यांना देवगड पाणीप्रश्नाबाबत शासनाने कोणती कारवाई केली आहे, असा जाब विचारला. त्यावर हा पाणीप्रश्न नगरोत्थान योजनेमधून नगरपंचायत झाल्यावर सोडविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आम्हाला नगरपंचायत होईपर्यंत विलंब नको आहे. आताच पाणीप्रश्न सुटला पाहिजे. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना तत्काळ या ठिकाणी निमंत्रित करा, असे आमदार राणे यांनी सांगितले.
पालकमंत्री केसरकर व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी तहसील कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना धक्काबुक्कीही झाली. अखेर उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून लेखी स्वरूपात आश्वासन दिले.
यावेळी आमदार राणे म्हणाले की, देवगड-जामसंडेचा पाणीप्रश्न हा येथील जनतेच्या निगडित असलेला प्रश्न आहे. ३० वर्षे भाजपच्या आमदारांनी राजकारण केले. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी कोणतीही कृती केली नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागले. देवगडचा पाणीप्रश्न मिटेपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. ३० नोव्हेंबरनंतर हा प्रश्न निकाली न निघाल्यास १ डिसेंबरपासून आमचा पुन्हा संघर्ष चालू राहणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे.
देवगडमधील अनेक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता; मात्र कुठलीही संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आली नाही.
पोलिसांनी आमदार राणेंसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. काहीवेळाने सर्वांना सोडून देण्यात आले.
अज्ञातांकडून अंडी, दगडफेक
रास्ता रोको व सरकारच्या विरोधात घोषणा देत असताना अज्ञातांकडून अंडी व दगडफेक करण्यात आली. यातील एक दगड देवगड तहसीलदार जीवन देसाई यांच्या उजव्या हाताला स्पर्श करून गेला. यावेळी आंदोलकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

Web Title: Congress 'path stop' in Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.