सोनाळी येथे काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते भिडल

By admin | Published: March 17, 2015 12:21 AM2015-03-17T00:21:03+5:302015-03-17T00:21:59+5:30

तुफान दगडफेक : सात जणांवर गुन्हे ; वैभववाडीत तणाव

Congress-Shiv Sena activist Bhidal at Sonali | सोनाळी येथे काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते भिडल

सोनाळी येथे काँग्रेस-शिवसेना कार्यकर्ते भिडल

Next

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : सोनाळी येथील काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वैभववाडी शहरात रविवारी रात्री तीनदा समोरासमोर भिडले. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांवर तुफान दगडफेकही केली. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती होती. तासाभराने पोलिसांनी जमावाला पांगवून वातावरण शांत केले. या प्रकारानंतर परस्परविरोधी तक्रारींवरून माजी सभापती अरविंद रावराणे, सोनाळीचे सरपंच प्रकाश शेलार, पोलीसपाटील राजेंद्र रावराणेंसह सातजणांवर अदखलपात्र गुन्हे नोंदविले आहेत.
येथील वैभवलक्ष्मी पेट्रोल पंपावर सोनाळीतील राजकीय हाणामारीची ठिणगी पडली. शिवसेना कार्यकर्ता अनिल ऊर्फ बारक्या कदम आणि काँग्रेस नेते माजी सभापती अरविंद रावराणे यांच्यात रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास हातापायी झाली. त्यावेळी सरपंच प्रकाश शेलारही त्यामध्ये सहभागी होते. पंपावरील घटनेनंतर अनिल कदम याने पोलीस ठाणे गाठल्यानंतर १० ते १५ मिनिटांतच रावराणेंचे कार्यकर्ते सोनाळीतून वैभववाडी शहरात दाखल झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
पोलीस ठाण्याच्या आवारात दगडफेक
अनिल कदम हा मारहाणीची तक्रार देत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात भिडले. तेथील अपुऱ्या उजेडाचा फायदा घेत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतानाही एकमेकांवर त्यांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीनंतर वातावरण आणखीनच तापले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीचा वापर करून पोलीस ठाण्याच्या आवारातील जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. पोलीसठाण्याच्या आवारातून सेना-काँग्रेस कार्यकर्ते संभाजी चौकात दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात हाणामारी झाली.
सातजणांवर अदखलपात्र गुन्हे
शिवसेना कार्यकर्ता अनिल कदम याने दिलेल्या तक्रारीनुसार कदम पेट्रोल पंपावर असताना माजी सभापती अरविंद रावराणे व सरपंच प्रकाश शेलार यांनी तू आम्हाला पाहून का थुंकलास, असे विचारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार अनिल कदमने दिली आहे. तर आपण पेट्रोल पंपावरून जात असताना अनिल कदमने दुचाकी माझ्या गाडीसमोर आडवी लावून तू काय समजतोस, अशी भाषा वापरत शर्ट पकडून धक्काबुक्की केली, अशी तक्रार अरविंद रावराणे यांनी दिली आहे. तर पोलीस ठाण्याच्या आवारातून हुसकावल्यानंतर संभाजी चौकात पोलीस पाटील राजेंद्र रावराणे, दीपक कारेकर, समाधान जाधव व मनोहर तळेकर यांनी रवींद्र सुतार याला गावात आल्यावर ठार मारू, अशी धमकी दिली. तशी रवींद्र सुतारने पोलिसांत तक्रार दिली आहे. अरविंद रावराणे, प्रकाश शेलार, अनिल कदम, राजेंद्र रावराणे, दीपक कारेकर, समाधान जाधव, मनोहर तळेकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.


निमित्त सोसायटी निवडणुकीचे
सोनाळी गावातील राजकारणावर अरविंद रावराणे यांचा प्रभाव राहिला आहे. येथे झालेल्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेने पॅनेल केले होते. तरीही अरविंद रावराणेंच्या पॅनेलने सर्व जागांवर अल्प मताधिक्क्याने विजय मिळविला. त्यामुळे सेना-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांवर लक्ष ठेवून होते. त्यातच चव्हाट्यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार केला गेला. त्यातूनच ही घटना घडल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.

Web Title: Congress-Shiv Sena activist Bhidal at Sonali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.