काँग्रेस, शिवसेना सदस्यांत खडाजंगी
By admin | Published: November 30, 2015 11:14 PM2015-11-30T23:14:09+5:302015-12-01T00:17:45+5:30
कुडाळ पंचायत समिती सभा : वैभव नाईक अभिनंदन ठरावावरुन वाद
कुडाळ : हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका आली नसताना आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव कसा काय घेतला? असा प्रश्न उपस्थित करत हा ठराव घेण्यात येवू नये अशी भूमिका कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य दिपक नारकर यांनी कुडाळ पंचायत समितीच्या बैठकीत केली. या मुद्यावरून दिपक नारकर व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे यांच्यात खडाजंगी झाली. यानंतर बहुमताने हा अभिनंदनाचा ठराव नामंजूर करण्यात आला.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी संपन्न झाली. या सभेला सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर.के सावंत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होते. सुरुवातीला शहीद झालेल्या सातारा येथील जवान कर्नल संतोष महाडिक यांना आदरांजली वाहण्यात आली.
सभेत हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राला अजूनही रुग्णवाहिका आलेली नसतानाही मागच्या मासिक सभेत अगोदरच आमदारांचा अभिनंदनाचा ठराव कसा काय घेतला? असा प्रश्न दिपक नारकर यांनी उपस्थित करत सदरचा ठराव नामंजूर करण्यात यावा अशी भूमिका मांडली.
यावरून शिवसेनेचे बबन बोभाटे व नारकर यांच्यात खडाजंगी झाली यावेळी बोलताना बोभाटे म्हणाले की, हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देणेत यावे याकरिता आमदार वैभव नाईक यांनी आपल्या निधीतून रुग्णवाहिका मंजूर केली असून तसे पत्र जिल्हानियोजनाकडून पुढील कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग यांच्या कडे दिलेले आहे. रुग्णवाहिका येणारच आहे फक्त काही प्रक्रियेमुळे अजून थोडा कालावधी लागणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावरून रुग्णवाहिका येण्याअगोदरच का अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला हा ठराव नामंजूर करावा अशी भूमिका नारकर यांनी घेतल्यानंतर सभापती व उपस्थितांमधील पंचायत समिती सदस्यांच्या बहुमतांनी हा पूर्वी घेतलेला अभिनंदनाचा ठराव नामंजूर करण्यात आला.
गेले काही महिने शालेयपोषण आहार ठप्प आहे बरेच शिक्षक सायंकाळी शाळा सुटायच्या अगोदर शाळेच्या बाहेर असतात यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण नसल्याचे पं.स किशोर मर्गज यांनी निदर्शनास आणून दिले.तसेच गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सद्या सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या जवळ आहे.सदरचा कार्यभार कुडाळच्या बाक्रे यांच्याकडे देण्यात यावा, अशीही मागणी करणेत आली.
पर्यावरण ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत आलेल्या ४ कोटी ५० लाखांची माहिती सभेत द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. पुढील सभा घावनळे येथे सभापतीच्या मतदारसंघात घेण्याचे ठरले. भातपीक स्पर्धेत डिगस येथील अनंत चंद्रकांत तावडे यांचा प्रथम तर ज्ञानेश्वर माईणकर यांचा द्वितीय क्रमांक आला. त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. (प्रतिनिधी)
नेमकी भूमिका काय?
मागच्या सभेत सभापती घावनळकर यांच्याच अध्यक्षतेखाली रुग्णवाहिका संदर्भात आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला होता. आज सभापतींच्याच अध्यक्षतेखाली हा ठराव नामंजूर करण्यात आला त्यामुळे सभापती घावनळकर यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.