वीज वितरणविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
By admin | Published: January 16, 2015 09:26 PM2015-01-16T21:26:25+5:302015-01-17T00:10:48+5:30
वेंगुर्ले तालुक्यातील समस्या : धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरासह तालुक्यात वीज वितरणच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. यामध्ये शॉर्टसर्किट, गंजलेले खांब, विद्युत प्रवाहात अनियमितता तसेच विद्युत तारांचे गार्डिंग आदींचा समावेश आहे. ही धोकादायक कामे तत्काळ पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करावी. अन्यथा वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्यावतीने वेंगुर्ले येथे धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवेदन सादर करून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
वेंगुर्ले तालुक्यात व शहरात वीज वितरणाबाबत अनेक गंभीर समस्या आहेत. या समस्या वेळीच सोडविल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा नागरिकांची वित्तीय हानी होण्याबरोबरच प्रसंगी जिवितहानीही होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावंतवाडीसारखा प्रकार वेंगुर्लेत होईल, याची वाट न पाहता या समस्या तत्काळ सोडवाव्यात. वेंगुर्लेतील दाभोली नाका, पिराचा दर्गा, रामेश्वर मंदिर नाका, हॉस्पिटलनाका येथील ट्रान्सफार्मर तसेच इतर ठिकाणी वरचेवर शॉर्ट सर्किट होते. तसेच वीज खांबावर स्फोटसदृश आवाज होणे, आगीच्या ठिणग्या पडणे, आगीच्या ज्वाळा खाली पडणे, वीजभारित तारा तुटून पडणे असे प्रकार होत असतात. जंक्शन वरील बऱ्याच खांबांवर विजेच्या तारांचा गुंता झालेला दिसतो. तो सोडवून तारा व्यवस्थित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेंगुर्ले तालुक्यात विद्युत प्रवाहाच्या अनियमित दाबामुळे घरातील विद्युत उपकरणे, उदा. दूरदर्शन, फ्रीज, संगणक, मिक्सर आदी जळून नुकसान होत आहे. अशा घटना चार-पाच वेळा तालुक्यात घडल्या आहेत. परिणामी नागरिकांना या प्रकारामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या जीवनाशी संबंधित या समस्या असल्याने वीज वितरण कंपनीने जबाबदारीने या समस्या येत्या पंधरा दिवसात सोडवाव्यात. अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उभारावे लागेल, असा इशारा वेंगुर्लेतील वीज वितरणच्या कार्यालयात उपस्थित अधिकारी चव्हाण यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, गिरगोल फर्नांडिस, भूषण सारंग, समीर कुडाळकर, प्रशांत आजगावकर, भूषण आंगचेकर, पप्पू परब, सायमन आल्मेडा, मारुती दोडनशेट्टी, मिलिंद वेंगुर्लेकर, महेश घाडी, राजेश डुबळे, जान्सू डिसोजा, सायमन आल्मेडा, समीर परब, तन्मय जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीज तारांना गार्डींगचे काम तत्काळ हाती घ्या
वीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारा अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. ठिकठिकाणी विद्युत खांबांवरील विजेच्या तारांना योग्य जागेवर जोड दिला नसल्याने त्या लोंबकळत असून, तत्काळ अशा तारा पूर्णत: बदलून घेणे गरजेचे आहे. तारांप्रमाणेच विद्युत खांबांची अवस्थाही दयनीय आहे. खांबाचा मधला भाग गंजून गेल्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब एक-दोन बोटांच्या अंतरावरील आधारामुळे उभे आहेत. असे खांब पाहणी करून तत्काळ बदलले पाहिजेत. भविष्यात सावंतवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेसारखी घटना वेंगुर्लेत घडू नये, म्हणून विद्युत तारांना गार्डींग करण्याचे काम तत्काळ हाती घेणे आवश्यक आहे.