सावंतवाडीत काँग्रेसची मोर्चेबांधणी
By admin | Published: October 16, 2015 09:14 PM2015-10-16T21:14:39+5:302015-10-16T22:39:39+5:30
नव्या शहर अध्यक्षांच्या शोधात : नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार
सावंतवाडी : नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपल्याने काँग्रेसने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शहर काँगे्र्रसमध्ये बदल घडवून आणत नव्या दमाच्या कार्यकर्त्याकडे शहर काँग्रेसची धुरा देत जुन्यांना बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा पहिला फटका शहरअध्यक्ष मंदार नार्वेकर यांना बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेसासाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसून येत आहे.नगरपालिका निवडणूक अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. मागील वेळी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाने काँग्रेसचा सफाया करीत १७च्या १७ जागा खेचून आणल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन शहरअध्यक्ष अतुल पेंढारकर यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. त्यानंतर शहर अध्यक्षाची जबाबदारी मंदार नार्वेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत शहरअध्यक्ष मंदार नार्वेकर यांनी पक्षाला चेहरा दिला. मात्र, अपेक्षित अशी आंदोलने तसेच शहरातील विविध प्रश्नावर आवाज उठविण्यात आला नाही. सावंतवाडी शहरात नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे. त्यावर सत्ता कोणाची आहे. या राजकीय प्रश्नाबरोबरच शहरात आरोग्याची समस्या, नगरपालिकेने अनेक ठिकाणी निवासी इमारतींना परवानग्या दिल्या. मात्र, त्यांच्या ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली नाही. गटारांची साफसफाई करण्यात येत नाही. अशा अनेक समस्या आहेत; पण यावर काँग्रेसने कधी आंदोलन केले नाही तर कधी यावर आवाज उठविला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष नेहमीच निवांत राहिला आहे.
सावंतवाडीचे शहरअध्यक्ष मंदार नार्वेकर यांनी कामाच्या व्यापामुळे पक्षाला हवा तसा वेळ देता येत नसल्याने राजीनामा देण्याचे पक्षाच्या बैठकीत सूतोवाच केले होते. त्यामुळे आता पालिका निवडणुकीला अवघे दीड वर्ष राहिले असून, शहर काँग्रेसमध्ये बदल घडवून आणत पुढील काळात जास्तीत जास्त आंदोलन, उपोषणे अशा प्रकारावर काँग्रेस भर देणार असून, भविष्यातील सत्ता ही आपल्या ताब्यात रहावी यासाठी काँग्रेस सर्व प्रयत्न करणार आहे. कारण काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष हे मडूरा येथील असले तरी ते सावंतवाडी शहरातच राहत असल्याने ही पालिका काँग्रेसच्या ताब्यात आली नाही तर काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडे आपले वजन घटू शकते तर पालिका काँग्रेसच्या ताब्यात आली तर संजू परब हे राज्यात हिरो होऊ शकतात कारण आतापर्यंत राज्यमंत्री असलेले दीपक केसरकर यांनी गेली वीस वर्षे सावंतवाडीचे नेतृत्व एकहाती आपल्याकडे ठेवले आहे.
आपण नगराध्यक्ष असलो किंवा नसलो तरी नागरिक हे आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने पालिका निवडणूक प्रतिष्ठेची केल्यास दीपक केसरकरांचा चांगलाच कस लागणार आहे. (प्रतिनिधी)
मूलभूत समस्या : नागरिक संभ्रमात
नार्वेकर यांच्या काळात फक्त सावंतवाडीतील गांधी चौकातील रस्त्याच्या प्रश्नावर फक्त एकदाच आवाज उठविला होता. त्यानंतर किंवा त्यापूर्वी एकही आंदोलन हाताळण्यात आले नसल्याने शहरातील नागरिक संभ्रमात आहेत. याचीच दखल घेत काँग्रेसने आता शहर काँग्रेसमध्ये बदल घडविण्याचे ठरविले आहे.