निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडून घ्यावे
By admin | Published: April 8, 2015 09:34 PM2015-04-08T21:34:31+5:302015-04-08T23:54:32+5:30
के. मंजुलक्ष्मी : ३१ जुलैपर्यंत राबवली जाणार मोहीम, मतदारांना आवाहन
राजापूर : राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रमाअंतर्गत मतदारांनी आपले निवडणूक ओळखपत्र आधारकार्डशी जोडून घ्यावे, असे आवाहन राजापूरच्या परिविक्षाधिन तहसीलदार के. मंजुलक्ष्मी यांनी आयोजित पत्रकार परिषदेवेळी केले आहे. हा कार्यक्रम ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येणार असल्याची माहिती यावळी राजापूरचे निवडणूक नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दिनांक १ जानेवारीचा मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाला या याद्यांमध्ये दुबार मतदारांच्या नोंदी, दुबार फोटो, दुबार ओळखपत्र क्रमांक इत्यादी चुका व दोष असल्याचे दिसून आल्याने नागरिकांना नावनोंदणी व दुरुस्ती यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आयोगाने हा कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राजापुरात या कार्यक्रमाची सुरुवात ३ मार्चपासून करण्यात आल्याची माहितीही तहसीलदार के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
राजापूर तालुक्यात १ लाख २४ हजार ३६६ मतदार आहेत. त्यातील ३ हजार ७४५ मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र नसल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. १ जानेवारीच्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील ७ हजार ७५९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तरीही या यादीमध्ये चुका असल्याचे निदर्शनास आल्याने व मतदार यादीतील वगळणी, चुकांची दुरुस्ती याबाबत ठोस कार्यपध्दती अवलंबली जात नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी मतदार याद्या शुध्दीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम हाती घेतला आहे.
आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन मतदार आपले आधार कार्ड निवडणूक ओळखपत्राशी जोडू शकतात, तसेच नमुना ‘अ’चा अर्ज भरुन निवडणूक नायब तहसीलदारांकडे भरुन देऊनही आपले आधारकार्ड निवडणूक ओळखपत्राशी जोडू शकतात, अशी माहितीही यावेळी बोलताना निवडणूक नायब तहसीलदार मुसळे यांनी दिली. तसेच मतदार आपले आधारकार्ड निवडणूक आयोगाच्या टोल फ्रीक्रमांक १९५० वर कॉल करुन किंवा ५१९६९ या नंबरवर एसएमएस करुनही जोडू शकतात, असेही यावेळी मुसळे यांनी बोलताना सांगितले. तसेच निवडणूक यंत्रणेमार्फत आधारकार्ड गोळा करुनही त्याची नोंदणी केली जाणार आहे, यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांनी दारोदारी भेटी देऊन मतदारांकडून आधारकार्ड क्रमांक गोळा करणे, मतदार नोंदणी अधिकारी यांनी माहिती मतदार सुविधा केंद्र, महा - ई सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्रामार्फत गोळा करून. आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करायची आहे, अशी माहितीही मुसळे यांनी दिली. (प्रतिनिधी)