संपूर्ण भारत कोकणशी ‘कनेक्ट’

By admin | Published: September 7, 2016 09:35 PM2016-09-07T21:35:25+5:302016-09-07T23:55:16+5:30

सुरेश प्रभू : बंदर धोरण लवकरच; प. महाराष्ट्रसह देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे जोडणार

'Connect' to entire India, Konkan | संपूर्ण भारत कोकणशी ‘कनेक्ट’

संपूर्ण भारत कोकणशी ‘कनेक्ट’

Next

मालवण : कोकणातील पर्यटनामुळे देशासह विदेशातील हौशी कोकणाशी कनेक्ट झाले आहेत. पर्यटनाबरोबरच कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून संपूर्ण भारत देश कोकणला जोडण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून कऱ्हाड ते चिपळूण आणि वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गांमुळे पश्चिम महाराष्ट्रसह भारतातील प्रमुख शहरे कोकणला ‘कनेक्ट’ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय पुढाकार घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील मेढा येथील निवासस्थानी आलेल्या मंत्री प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती देताना येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण देशाशी जोडले गेलेले असणार आहे. केंद्राच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. कोकणला जोडण्यात येणाऱ्या नव्या रेल्वेमार्गांमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणला प्रगतीची दिशा मिळेल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)


बंदरांचाही विकास करणार
मंत्री प्रभू म्हणाले, भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बंदरांची प्रगती न झाल्याने भारताच्या किनारपट्टीवर म्हणावा तसा विकास साध्य करता आला नाही. मात्र, याबाबत मोदी सरकार सकारात्मक असून, भारतातील बंदरांना चालना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांना गतवैभव व चालना मिळून येथील भागाचा विकास साधण्यासाठी मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच कोकणातील बंदरांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात येईल.
जिल्ह्याच्या विकासासाठी युती हवीच!
जिल्ह्यात होत असलेल्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीबाबत विचारले असता प्रभू म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेत युती होणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गातील मतदार मोठ्या प्रमाणात युतीचाच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांत युती व्हावी ही आपली इच्छा असून, याचा फायदाही मतदारांना होणार आहे. जिल्ह्यात युती होण्यासाठी आपणही प्रयत्न करणार आहोत.

Web Title: 'Connect' to entire India, Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.