रत्नागिरीतील गुन्हेगारीचे लखनौपर्यंत कनेक्शन
By admin | Published: September 20, 2015 09:48 PM2015-09-20T21:48:15+5:302015-09-21T00:08:08+5:30
ठेकेदार खून : मोईनकडून पोलिसांची दिशाभूल
रत्नागिरी : अभिजित पाटणकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोईन काझी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने अभिजितचा केलेला खून हा मोबाईल विक्रीच्या व्यवहारातून झाला, की आणखी काही कारणे या खुनामागे होती, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. अभिजितच्या खुनामुळे रत्नागिरीच्या गुन्हेगारीचे लखनौशी असलेले कनेक्शन उघड झाले असले, तरी गुन्हेगारीचे हे ‘नेटवर्क’ उघडे पाडणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ठेकेदार स्वप्निल मोरे यांच्या निर्घृण खुनानंतर अभिजित पाटणकर या ठेकेदार तरुणाचा गोळ्या झाडून खून झाल्याने शांत रत्नागिरीच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमधील संघर्षातून झालेला खून असल्याचे पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेकांकडे परवाना असलेल्या बंदुका, पिस्तूल्स आहेत, परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडे परवाना नसलेली अनेक शस्त्रे असावीत, अशी चर्चा नेहमीच होते. ही शस्त्रे जर असतील तर ती येतात कुठून, कोणाकडून या शस्त्रांचा पुरवठा केला जातो याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडे काय व्यवस्था आहे, असा सवालही निर्माण झाला आहे.
रत्नागिरीच्या काही ठरावीक भागात ‘राडेबाजी’चे प्रकार नेहमीच सुरू असतात. जुगाराचे अड्डेही चर्चेत आहेत. या सर्व प्रकारांना कोणाचे अभय आहे? कोणामुळे ही विषवल्ली पसरत चालली आहे? गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहर व परिसरात अफू, गांजा तसेच गर्दसारखे मादक पदार्थही उपलब्ध होत आहेत. वन्य प्राण्यांची चामडी, कासवांची तस्करी, काही दुर्मीळ व महत्त्वाच्या वनस्पतींची चोरी, तस्करी हे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे यामागे गुन्हेगारीचे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (प्रतिनिधी)
रॅकेटची बांधणी?
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेरही बहुचर्चित बनले आहे. रायगडच्या औद्योगिकीकरणानंतर आता रत्नागिरीच्या औद्योगिकीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक उद्योग येथे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक रत्नागिरीत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही गुन्हेगारांचे रॅकेट आतापासूनच कार्यरत झाले आहे काय, अशी चर्चाही लखनौ कनेक्शनमुळे सुरू झाली आहे.
मोईन व लखनवी माफिया
मोईनचे लखनवी माफियाशी संबंध आहेत हे पोलिसांनी तपासात उघड केलेले सत्य आहे. त्यामुळे हे गुन्हेगारीचे रत्नागिरी ते लखनौ रॅकेट उखडून काढण्यासाठी रत्नागिरी व लखनौ पोलिसांना संयुक्तपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील गुुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता ते लोण शांत असलेल्या कोकणात येऊ नये, यासाठी हे रॅकेट उखडून टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या मोईनने अभिजितचा काटा काढला त्याच्याकडे अटक केल्यानंतर चार मोबाईल, २१ सीमकार्ड व अनेक बनावट ओळखपत्र सापडणे ही बाबही गंभीर आहे.