कणेवाडीचा धबधबा दुर्लक्षित

By admin | Published: July 17, 2017 12:26 AM2017-07-17T00:26:31+5:302017-07-17T00:26:31+5:30

कणेवाडीचा धबधबा दुर्लक्षित

Conservation of Kanewadi waterfalls | कणेवाडीचा धबधबा दुर्लक्षित

कणेवाडीचा धबधबा दुर्लक्षित

Next


निलेश मोरजकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. बारमाही पाण्याचे नैसर्गिक स्रोत असलेल्या गावातील कणेवाडी येथील धबधबादेखील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. तब्बल चाळीस फूट उंचीवरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचा आनंद लुुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र हा धबधबा दुर्लक्षित असल्याने तसेच याठिकाणी प्राथमिक सेवा सुविधांची वानवा असल्याने येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.
असनिये गावाला ऐतिहासिक संदर्भ लाभले आहेत. बारमाही पाण्याचे स्रोत असलेल्या या गावात शेती बागायती मोठ्या प्रमाणात आहे. गावात ८३ नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. यामुळे गावात कधीही पाण्याचे दुुर्भिक्ष्य जाणवत नाही. गावातील ग्रामस्थांनी या नैसर्गिक पाण्यावरच आपल्या शेती-बागायती फुलविल्या आहेत. नैसर्गिक पाण्याबरोबरच दुर्मिळ वनौषधींनीदेखील गाव समृध्द आहे. येथील जंगलात विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी आढळतात.
नारळ, सुपारींच्या बागांबरोबरच येथे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. असनिये गावातील प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला स्थानिकांनी एकजुटीने प्रखरपणे विरोध दर्शविला आहे. याठिकाणी विनाशकारी मायनिंग प्रकल्प झाल्यास येथील नैसर्गिक ठेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती आहे. बारमाही पाणी व समृध्द जंगल यामुळे याठिकाणी जंगली प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. गावात पट्टेरी वाघाचे दर्शनही ग्रामस्थांना झाले आहे. त्याचबरोबरच बिबट्या, चितळे, सांबर, डुक्कर, गवे जंगलात पहावयास मिळतात. गावात गर्द वनराईमुळे दुर्मिळ धनेश पक्षी वास्तव्यास असतो. या दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्याचे जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी गावात ठिकठिकाणी या पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.
असनिये गावाला तंटामुक्त गाव, निर्मलग्राम, पर्यावरण विकासरत्न अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नाथपंथीय श्री संत गोसावीबाबांच्या वास्तव्याने पतितपावन झालेले असनिये गाव हे तीर्थक्षेत्रीय भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. असनिये गावाच्या प्रसिद्ध शिमगोत्सवाप्रसंगी प्राचीन इकाच्या वाटीतील तीर्थासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दरवर्षी गावात गर्दी करतात. गावात परंपरेने असलेल्या बारमाही दारुबंदीचे वृत्त अंगिकारत येथील तीर्थाचे पावित्र्य आजची पिढीही तेवढ्याच गांभीर्याने जपत आहे.
असनिये-घारपी मार्गावरील कणेवाडी येथील धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. असनिये-घारपी मार्गावरुन या धबधब्याचे विहंगम दर्शन होते. डोंगरातून वाहणारा हा धबधबा असनिये गावाच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी पक्की वाट नसून जंगलातून मार्ग काढत या धबधब्याकडे जावे लागते. धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्याची भव्यता लक्षात येते. तब्बल ४0 फूट उंचावरून दगडातून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे पर्यटकही याकडे आकर्षित होतात. सुटीच्या दिवशी स्थानिकांसह परिसरातील पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा मरमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र याठिकाणी प्राथमिक सुविधाही नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करतात.
प्रस्ताव धूळखात; विकास होण्याची गरज
कणेवाडी धबधबा पर्यटकांना पर्वणी ठरु शकतो. सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे आंबोली घाट पर्यटकांसाठी असुरक्षित ठरत असून पर्यटकांना असनिये येथील धबधबा पर्याय ठरु शकतो. यासाठी शासनाने पश्चिम घाटातील दुर्लक्षित नैसर्गिक स्थळांचा विकास करणे गरजेचे आहे. बांदा शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर हा धबधबा असल्याने गोवा तसेच परिसरातील पर्यटकांना याठिकाणी येणे सोयीचे होणार आहे.
या धबधब्याचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास करावा यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडे चार वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येत आहे. असनिये-घारपी रस्त्यावरुन धबधब्याकडे जाण्यासाठी १00 मीटर अंतर असून ही पायवाट पक्की करावी. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी लोखंडी रॅम्प उभारावेत, पर्यटकांना माहिती होण्यासाठी दिशादर्शक तसेच माहिती फलक उभारावेत अशी मागणी प्रस्तावात केली आहे. शासन दरबारी या धबधब्याचा विकासाचा प्रस्ताव हा धूळखात पडला आहे. यावर्षी ग्रामपंचायतीने धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाटेची दुरुस्ती केली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी गावातील महिला बचतगटाच्या महिलांनी स्टॉलही उभारला आहे, अशी माहिती असनियेचे सरपंच गजानन सावंत यांनी दिली.

Web Title: Conservation of Kanewadi waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.