बांधकाम अभियंत्याला मारहाण, नेरुर येथील तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:33 AM2019-03-04T10:33:18+5:302019-03-04T10:35:06+5:30
कुडाळ नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा वीजनिर्मिती प्रकल्प इमारतीचे काम करण्यासाठी गेलेल्या नगरपंचायत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेरूर येथील प्रभाकर उर्फ गणेश गावडे, सहास मुळम व सुवर्णा कदम या तिघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ : नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा वीजनिर्मिती प्रकल्प इमारतीचे काम करण्यासाठी गेलेल्या नगरपंचायत बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेरूर येथील प्रभाकर उर्फ गणेश गावडे, सहास मुळम व सुवर्णा कदम या तिघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले अभियंता विशाल सत्यवान होडावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्पासाठी कुडाळ येथे भूखंड मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा भूखंड नागरी वस्तीपासून जवळ असल्याने याचा आपल्याला त्रास होणार असल्याचे नेरूर ग्रामस्थांचे म्हणणे असून, या प्रकल्पाला अनेक वेळा विरोध केला आहे. तसेच बांधकाम बंद पाडण्याचाही अनेक वेळा प्रयत्न केला आहे.
शनिवारी सकाळी प्रकल्पाच्या इमारतीच्या खोदाईसाठी होडावडेकर, त्यांचे सहकारी राजाराम नारायण कुंभार व नगरपंचायतीचे कर्मचारी आणि कामगार गेले होते. यावेळी तेथे तीन व्यक्ती येऊन त्यांनी जेसीबी चालकांना काम बंद करण्यास सांगून मारहाण केली. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून चित्रीकरणाचा कॅमेरा काढून घेत काम बंद करण्याची धमकी देत निघून गेले, अशी माहिती दिली.
याबाबतची माहिती मुख्याधिकारी देवानंद ढेकळे व नगराध्यक्ष ओंकार तेली यांना दिल्यानंतर होडावडेकर कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. तसेच नगराध्यक्ष तेली, मुख्याधिकारी ढेकळे तसेच नगरपंचायतीचे सर्व सभापती व नगरसेवकांनी पोलीस ठाणे गाठले.
अभियंता होडावडेकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. तसेच होडाववडेकर यांना झालेली मारहारण चुकीची असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, कुडाळ येथे आमसभेसाठी आलेले आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात येऊन उपस्थित दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच नगराध्यक्ष तेली, नेरूर सरपंच शेखर गावडे यांच्याशी चर्चा केली.