सावंतवाडीला पोहोचलेच नाहीत, कणकवलीतच अडकले बांधकाममंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 12:29 AM2018-09-01T00:29:39+5:302018-09-01T00:35:27+5:30
मुंबई गोवा मार्गावरचे खड्डे पाहणीसाठी शुक्रवारी सकाळी निघालेली बांधकाममंत्र्याची गाडी मध्यरात्री बारा वाजेपर्यत कणकवलीतच थांबली होती.
सावंतवाडी : मुंबई गोवा मार्गावरचे खड्डे पाहणीसाठी शुक्रवारी सकाळी निघालेली बांधकाममंत्र्याची गाडी मध्यरात्री बारा वाजेपर्यत कणकवलीतच थांबली होती. अखेर त्यानी सावंतवाडीत येणे टाळत ओरोस येथील विश्रामगृहातच मुक्काम ठोकला. त्यामुळे लाखो रूपये खर्च करून विश्रामगृहांवर लखलखाट आणि आयोजित केलेल्या मेजवानीवर अधिकाऱ्यांनाच ताव मारावा लागला. आता, बांधकाममंत्री भल्या पहाटे रस्त्याची पाहणी करणार अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळत नाही.
शुक्रवारी सकाळी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे पनवेल येथून खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी निघाले होते. पाटील हे रात्री 8 वाजेपर्यंत सावंतवाडीत पोहचणार होते. त्यासाठी बांधकाम विभागाचे सर्वच अधिकारी कामाला लागले होते. पर्णकुटी विश्रामगृहावर मंत्री महोदय येणार असल्याने विश्रामगृहांची सजावट आणि विद्युष रोषणाईही केली होती. बांधकाम मंत्र्याबरोबर तब्बल शंभर ते दिडशे अधिकारी व कार्यकर्ते असतील, म्हणून मेजवानीचीही तजवीज करण्यात आली होती. अधिकारी वर्ग रात्री बारा वाजेपर्यत विश्रामगृहावर वाट बघत होते. मात्र रात्री 10 वाजता अधिकाऱ्यांना मंत्री महोदय कणकवलीतूनच कोल्हापूरला जाणार असा निरोप आल्याने अधिकारी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला. तर, मंत्रीमहोदयासाठी आयोजित केलेल्या मेजवाणीवर अधिकाऱ्यांनी ताव मारला. मात्र, काही वेळातच मंत्री महोदय आता ओरोसमध्येच राहणार असा निरोप आल्याने अधिकारी वर्गाची चांगली धांदल उडाली.
खड्डे पाहणीसाठी सकाळी पनवेलहून निघालेले बांधकाममंत्री कणकवलीलाच अडकले. त्यामुळे त्याना सिंधुदुर्गातील खड्डेच पाहता आले नाहीत. बांधकाम विभागाच्या अख्यारित येणाऱ्या रस्त्यात त्याच खात्याचे मंत्री अडकल्याने अधिकाऱ्यांनीही खड्डे भरण्याच्या नावाखाली मंत्र्याच्याच डोळ्यात धुळफेक केल्याचे दिसत आहे. तसेच मंत्र्याच्या या दौऱ्यावर लाखो रूपये खर्च झाल्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी निदान ओरोस मुक्कामी थांबून सकाळी तरी सावंतवाडी पर्यतचे खड्डे पाहावेत. निदान गणेश चतुर्थीपर्यत खड्डे बुजण्यास मदत होईल, अन्यथा खड्डे भरण्याच्या नावावरही दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रूपये खर्च होतील हे विशेष.