किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी, बांधकामच्या अपर सचिवांनी कामांचा घेतला आढावा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 13, 2023 12:59 PM2023-10-13T12:59:49+5:302023-10-13T13:00:38+5:30
नौदल दिनाची पार्श्वभूमी, २८ला पुतळा दाखल होणार
सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी होत आहे. कामे गतीने सुरू आहेत. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. २८ ऑक्टोबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट येथे दाखल होणार आहे. त्यानंतर पुतळा उभारणी व उर्वरित कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती उपस्थितीत अधिकारी यांच्या चर्चेतून प्राप्त झाली आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांसह मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण शरद राजभोज, अधीक्षक अभियंता रत्नागिरी छाया नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता कणकवली सिंधुदुर्ग अजयकुमार सर्वगोड, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यासह बांधकाम, महसूल व अन्य विभाग अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही इमारतींची कामे ३१पर्यंत पूर्ण करणार : सर्वगोड
मालवण येथील शासकीय विश्रामगृहाची नव्याने उभारणी तसेच दुसऱ्या इमारतीची दुरुस्ती सुरू आहे. येथील कामांचा आढावा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या वतीने घेण्यात आला. दोन्ही इमारतींची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरही पाहणी
अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत तारकर्ली एमटीडीसी येथेही पाहणी केली. त्यानंतर तारकर्ली एमटीडीसी स्कुबाडायविंग सेंटर येथे आढावा बैठक घेतली. सुरू असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी सायंकाळी किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी भेट देत पाहणी केली. येथील मंदिरांची व परिसराची पाहणी करत आढावा घेण्यात आला.