ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे बांधकाम संथ
By admin | Published: May 22, 2015 09:33 PM2015-05-22T21:33:08+5:302015-05-23T00:37:47+5:30
दाभोलीतील पुलाची अवस्था : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीच गायब; काम निकृष्ट होण्याची भीती
वेंगुर्ले : रेडी-रेवस महामार्गावरील दाभोली गावात गेले साडेतीन महिने काम सुरू असलेल्या छोट्या पूल कम मोरीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे संथगतीने सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदार व अभियंता यांची उपस्थिती नसल्याने ते काम निकृष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
८ मे पर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या बांधकाम विभागाने ४ जूनपर्यंत पूल पूर्ण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे वेंगुर्ले बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या आंदोलनास हिंसक वळण लागून नुकसान झाल्यास त्यास बांधकाम खातेच जबाबदार राहील. तसेच पुलाच्या ठिकाणी अपघात व जीवितहानीचा प्रसंग घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम खात्यास जबाबदार धरले जाईल, असेही बांदवलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
दाभोली, खानोली, हरिचरणगिरी, वायंगणी, वेतोरे भागातील छोटे-मोठे व्यापारी तसेच शालेय मुले आणि रोजगारासाठी वेंगुर्ले शहरात जाणारे सर्वसामान्य यांच्यासाठी वेंगुर्ले शहर हे मुख्य ठिकाण असून, गेल्या साडेतीन महिन्यांपासून या गावातील रेडी-रेवस महामार्गावर पुलाचे (मोरीचे) काम सुरू आहे. ठेकेदार व अधिकारी यांची कामाच्या ठिकाणी उपस्थिती नसल्याने ८ मेपर्यंत पूर्ण होणारे काम अर्धवट राहिले आहे. (प्रतिनिधी)
आंदोलनाचा इशारा
पावसाळा तोंडावर आला असून, सखल भागातून काढलेला पर्यायी मार्ग पावसाळ्यात पूर्णत: बंद राहणार असून, वेंगुर्ले शहर आणि दाभोली पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटणार आहे.
या पुलाच्या ठिकाणी अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यापूर्वी मोरीचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. ४ जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांनी दिला आहे.