उद्योगधंद्यांच्या ‘हब’ची होणार निर्मिती : राजापूर होईल महानगरी--रिफायनरी एक सुवर्णसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:34 PM2019-01-12T23:34:06+5:302019-01-12T23:37:26+5:30
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी
महेश सरनाईक ।
सिंधुदुर्ग : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घेणार आहोत. हे पदार्थ उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. याचा वापर करून विविध साहित्य तयार केले जाते. यात विमानाच्या पार्टपासून अगदी प्लास्टिक पिशव्यांपर्यंतचा समावेश होतो.
रिफायनरी प्रकल्पाअंतर्गत पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या निर्मितीनंतर यातील ४५ टक्के आयात कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल्स पदार्थांच्या कितीतरी पटीने जास्त उत्पादन राजापूर रिफायनरी प्रकल्पामध्ये होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून उद्योगधंद्यांचा हब निर्माण होणार असून यातून अनेक नवनवीन उद्योग निर्माण होतील.
नाणार येथील रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्प १६ हजार एकर परिसरात होणार आहे. यात ३0 ते ३५ टक्के जमीन असून ३४ हजार एकरावर ग्रीन बेल्ट (वनसंपत्ती) आहे. प्रकल्पबाधीत क्षेत्रात कलमांची आणि रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ३0 टक्के जमिनीवर झाडे लावल्याशिवाय सरकार किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकल्पाला मंजुरीच देऊ शकत नाही. तशी तरतूद करारनाम्यात करण्यात आली आहे.
आता प्रकल्प होत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात येणाºया जमिनीतील ७३ टक्के जमीन ओसाड आहे. यात पाळेकरवाडी आणि चौके ही दोन गावे पूर्णपणे प्रकल्पबाधित आहेत. तर अन्य १२ गावे हे निम्मी बाहेर आणि निम्मी आत आहेत. तर प्रकल्पाला लागून दोन गावे ही इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतात. त्यात कुंभवडे व वाडापालये यांचा समावेश आहे. आता या प्रकल्पात राजापूर तालुक्यातील १४ गावे आणि सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दोन गावे ही प्रकल्पबाधित असल्याने या पूर्ण भागात शहरीकरण वाढेल.
कोकणात होईल घरवापसी
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सोडल्या तर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. परिणामी येथील घराघरातील सुशिक्षित व्यवसाय, उद्योगासाठी किंवा नोकरीसाठी पुणे, मुंंबई, कोल्हापूर, गोवा महानगरांची वाट धरतात. त्यामुळे कोकणातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे दरवर्षी स्थलांतर होत असते. नाणार येथील रिफायनरी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता व्यवसायासाठी, नोकरी धंद्यासाठी वणवण भटकणाºया सर्वांची या निमित्ताने कोकणात कायमस्वरूपी ‘घरवापसी’ होण्यास मदत होणार आहे.
आंबा, काजू, मच्छिमारीसाठी मोठी बाजारपेठ !
रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार येथे मोठ्या बाजारपेठा निर्माण होतील. मच्छिमार, आंबा बागायतदारांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होईल. सध्या या भागात मोठ्या बाजारपेठा नसल्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढत आहे. वाहतूक खर्चामुळे उत्पादन बाजारपेठेत नेईपर्यंत त्याचा दर गगनाला भिडणारा होत आहे. परिणामी ज्यावेळी येथील आंबा, काजू, नारळ व इतर पिकांना या भागातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्च पूर्णपणे वाचेल आणि परिणामी नफ्यातही वाढ होईल.
(पुढील भागात रिफायनरीतून प्रदूषण यात तारतम्यच नाही)