वीज कंपनीला ग्राहक मंचाच्या दणका
By admin | Published: March 7, 2017 05:44 PM2017-03-07T17:44:15+5:302017-03-07T17:44:15+5:30
वाडोस येथील राणे यांचा वीजपुरवठा खंडीत प्रकरण : १0 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश
वीज कंपनीला ग्राहक मंचाच्या दणका
वाडोस येथील राणे यांचा वीजपुरवठा खंडीत प्रकरण : १0 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश
सिंधुदुर्गनगरी : अवाजवी विद्युत बिल देत ते न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील वसंत देऊ राणे यांना बजावणाऱ्या महावितरण कंपनीला सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. राणे यांना बजावण्यात आलेली नोटिस रद्द करत त्यांना वीज देयक दुरुस्त करून देण्यासह त्यांना झालेल्या खर्चापोटी व नुकसानभरपाई म्हणून १0 हजार रुपये देण्याचे आदेशही महावितरण कंपनी कुडाळ विभाग यांना दिले आहेत. वसंत देऊ राणे यांनी डिसेंबर २0११ मध्ये वीज कनेक्शन घेवून वाडोस येथे पीठ व भात गिरण सुरु केली होती. राणे विद्युत मिटरच्या वापराप्रमाणे नियमितपणे विजबील भरणा करीत होते. जानेवारी २0१५ मध्ये त्यांच्या वीज मिटरचा डिस्प्ले गेला. याबाबत त्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे लेखी अर्ज देवून कल्पना दिली होती. मात्र विद्युत कंपनीने जुलै २0१५ पर्यंत त्यांचा विद्युत मीटर बदलून दिला नाही. मात्र राणे यांना अचानकपणे जुलै २0१५ मध्ये ७0 हजार २९0 रुपयांचे अवास्तव विजबिल देण्यात आले. या बिलात जानेवारी २0१५ ते जुलै २0१५ या कालावधीत एकूण १0 हजार ६0५ युनीट वापरले असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतू राणे यांनी वीज कनेक्शन घेतल्यापासून देखील एवढा विजेचा वापर केला नव्हता त्यांचे सरासरी मासिक विजबिल ५00 ते २000 रुपये एवढेच येत होते. याबाबत वसंत राणे यांनी हे वीज देयक दुरुस्त करून देण्यासाठी महावितरण कंपनी कुडाळ विभाग यांच्याकडे लेखी अर्ज केला होता मात्र महावितरण कंपनीने त्यांच्या या अर्जाकडे दुर्लक्ष करीत त्यांनाच विजबिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल अशी नोटिस महावितरणच्या विधी अधिकाऱ्यांमार्फत बजावली होती. सदर प्रकरणी वसंत राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर झालेल्या सुनावणित राणे यांची तक्रार ग्राहक मंचाने मान्य केली आहे. तसेच त्यांना महावितरण कंपनीने दिलेले अवास्तव वीज देयक व वीज पुरवठा खंडित करण्याची बजावलेली नोटीस रद्द ठरविली आहे. त्याचप्रमाणे राणे यांना मागील सरासरी वीज वापराप्रमाणे जानेवारी ते जून २0१५ पर्यंत विज देयके दुरुस्त करून देण्यासह त्यांना झालेल्या खर्चापोटी व नुकसान भरपाई म्हणून १0 हजार रुपये देण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाने महावितरणला दिले आहेत. राणे यांच्यावतीने अॅड. यतीश खानोलकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)