कंटेनरला आग लागून चालक जखमी
By admin | Published: July 15, 2016 10:28 PM2016-07-15T22:28:23+5:302016-07-15T22:36:03+5:30
लांजानजीक कुवे येथील दुर्घटना
लांजा : गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा केला. क्षणार्धात कंटेनरची केबिन जळून खाक झाली. त्यात कंटेनरचालक सैतानसिंग वैष्णोई
भाजला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लांजानजीक कुवे येथे घडली.
सैतानसिंग वैष्णोई (वय २६, सरान, ता. बिलारा, जि. जोधपूर, राजस्थान) हा आपला कंटेनर (आरजे १९ जीबी ७३९२) घेऊन सोमवारी (दि. ११) गुजरातहून गोव्याकडे निघाला होता. मंगळवारी (दि. १२) चिपळूण येथे कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने त्याने कंटेनरची ट्रॉली दुसऱ्या कंटेनरला जोडून पाठवून दिली. कंटेनर दुरुस्त झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) तो चिपळूण येथून निघाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजता गोव्याच्या दिशेने जाण्यास निघाला. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कुवे येथे ट्रकच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत कंटेनर बाजूला उभा केला आणि क्षणार्धात कंटेनरच्या केबिनला आग लागली.
मालकच स्वत: चालक असल्याने त्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे हात, पाय व केस होरपळून निघाले. त्यामुळे त्याने आग पेटत असलेला कंटेनर सोडून तो औषधोपचारासाठी खासगी वाहनाने ओणी येथे गेला. कंटेनरला आग लागल्याचे पाहून उमेश काशिनाथ सावंत, प्रसाद रामेश्वर चव्हाण यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने लांजा येथील बाळा शेट्ये व पिंट्या भाळेकर यांनी टाकीतून पाणी मागवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच पोलिस फौजदार सुरेश महाडिक, शशिकांत सावंत, संतोष झापडेकर, राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. (प्रतिनिधी)