...तर रत्नागिरीतून विधानसभा लढविणार
By admin | Published: June 30, 2016 10:13 PM2016-06-30T22:13:23+5:302016-06-30T23:56:17+5:30
भास्कर जाधव : उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र; रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
रत्नागिरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची आपली तयारी आहे, असे विधान करून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना आमदार उदय सामंत यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले.
रत्नागिरीतील माळनाका येथे गुरुवारी झालेल्या तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिबिरात जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाप्पा सावंत, नारळ बोर्डाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष
(पान १ वरून) कुमार शेट्ये, अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विक्रम जाधव, उपाध्यक्ष अजित यशवंतराव, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबू पाटील, तालुकाध्यक्ष सचिन कोतवडेकर, सरचिटणीस प्रभाकर मयेकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन वेळा आमदार, मंत्री व पालकमंत्री झालेल्या उदय सामंत यांना आणखी काय हवे होते? भाजपमधून तीन वेळा रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेल्या बाळ माने यांनी पक्ष सोडला नाही तर निष्ठेने त्यांच्या पक्षाचे काम केले व करीत आहेत. येथे मात्र सर्वकाही मिळूनही पक्ष सोडणाऱ्याबाबत काय आणि किती बोलावे, असा प्रश्न आहे. थापांमुळे फसवणूक झाल्याचे आता त्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची पक्षात ‘वापसी’ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला परिस्थिती आता अनुकूल होत आहे.
रामभाऊ गराटे, बाबू पाटील यांच्यासारखे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते राष्ट्रवादीत आहेत. रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन कोतवडेकर व शहराध्यक्ष नीलेश भोसले यांच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे. त्यांनी आता घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या मूळ मतदारांना, कार्यकर्त्यांना भेटायला हवे. चूक झाली असेल तर सुधारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, कार्यकर्ते लाईक फोंडू, सुभाष सावंत, सलमा काझी, जयप्रकाश भालेकर, बाळकृष्ण लवंदे, विकास तोडणकर, नारायण खोराटे, भाई जाधव यांनीही पक्षबांधणीबाबत सूचना केल्या आणि पक्ष कार्यालयाची मागणी केली. (प्रतिनिधी)
शिवसेनेची भाजपसमोर शरणागती...
सेना-भाजपच्या राजकारणात विविध प्राण्यांचा पूर आला आहे. कोण कोणाला बेडूक म्हणतय तर बोका म्हणतेय. पक्षप्रमुखांना बेडूक म्हणून भाजपने हिणवले गेले तरी सेना गप्प आहे. सेनेने कोणताही आरोप केला की भाजपकडून त्याच्या दुप्पट क्षमतेने प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील सेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. त्यामुळे आत्ताच्या राजकारणात भाजप हा सेनेला वरचढ ठरला आहे. सेनेला जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावे, असे भाजप प्रवक्ता बजावतो तरी सेनेत शांतता आहे. याचाच अर्थ शिवसेना आता बाळासाहेबांची सेना राहिलेली नसून पूर्णत: भाजपला शरण गेल्याचे स्पष्ट होत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.