वैभववाडीत गटाराचे काम सुरू
By admin | Published: December 20, 2014 11:21 PM2014-12-20T23:21:17+5:302014-12-20T23:21:17+5:30
पहिल्या टप्प्यात १0 लाख रुपये मंजुर
वैभववाडी : कित्येक वर्षाची मागणी असलेल्या वैभववाडी बाजारपेठेतील बहुप्रतिक्षित बंदिस्त गटाराच्या कामाला अखेर शनिवारी सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १0 लाख रुपये मंजुरी मिळालेल्या अंदाजपत्रकातून सुमारे २४0 मिटर गटाराचे बांधकाम हाती घेण्यात आले आहेत. बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा टप्प्याटप्प्याने गटाराचे काम पूर्ण केले जाणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
वैभववाडी बाजारपेठेतील मासळी बाजारापासून संपूर्ण पाणी पावसाळ्यात संभाजी चौकापर्यंत वाहून येते. हे पाणी जागोजागी डबक्यांमध्ये साचल्यामुळे दुर्गंधी पसरुन नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे १0 लाखाच्या अंदाजपत्रकाला दोन वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कामासाठी निधी नसल्यामुळे आधीच्या ठेकेदाराने वर्षभरापूर्वी मक्ता रद्द केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने फेरनिविदा काढली होती.
दरम्यानच्या काळात रस्त्याच्या बाजूपट्टी लगत बसस्थानकापासून गटार खोदून ठेवल्यामुळे पावसाळ्यात अनेक वाहनांसह विद्यार्थी व नागरिकांना फटका बसला होता. त्याबाबत वृत्तपत्रांनी वारंवार बांधकामचे लक्ष वेधल्यानंतर आता २४0 मिटर लांबीच्या बंदिस्त गटार बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बाजारपेठेच्या पूर्व बाजूला दत्तमंदिरपासून गटाराचे खोदकाम सुरु करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटाराचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे ३0 ते ३५ लाख निधीची आवश्यकता आहे.
भविष्यातील संभाव्य रस्ता रुंदीकरणाची शक्यता विचारात घेवून बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही नागरिकांच्या इमारतीसमोरील अनधिकृत पत्र्याची शेड गटार बांधकामात जाण्याची शक्यता आहे. परंतु बांधकाम विभागाने बंदीस्त गटाराच्या कामाला प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुरुवात केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)