सिंधुदुर्गात संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 11:47 PM2016-07-02T23:47:12+5:302016-07-02T23:47:12+5:30

बळिराजा सुखावला : गतवर्षीच्या तुलनेत ३0२७ मिलिमीटर जास्त पाऊस

Continuous advance in Sindhudurg | सिंधुदुर्गात संततधार सुरूच

सिंधुदुर्गात संततधार सुरूच

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची असणारी संततधार शनिवारीही सुरूच होती. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज अजूनपर्यंत तरी खरा ठरला आहे. दरम्यान, गेले पाच दिवस सिंधुुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चौवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात पडला आहे.
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात १२९१.३० च्या सरासरीने १०३२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच दिवसापर्यंत ९१२.६५ च्या सरासरीने ७३००.२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात पडझड होऊन ११ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाने बळिराजा मात्र सुखावला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी तो समाधानकारक बरसत आहे. यंदा सरासरीपेक्षा १३० टक्के पाऊस जास्त पडणार असे हवामान खात्याचे भाकीत सद्य:स्थितीत तरी सत्यात उतरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस पडला
असून, शेतीसाठी पूरक असा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना जोर चढला आहे.
१९ जूनपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अद्यापपर्यंत पाचजणांचे बळी घेतले असून त्यापैकी दोन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे प्रशासनाकडून मदत केली आहे. पाच जनावरे मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी एका जनावराच्या मालकाला २५ हजारांची मदत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वरवडेत पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प
कणकवली तालुक्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. वरवडे सेंट उसुर्ला स्कूलजवळ कणकवली-आचरा रस्त्यावर सकाळी ७ वाजता पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद झाला होता. त्यानंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरु झाली. कणकवली-आचरा, कलमठ -फणसवाडी, बिडवाडी, आडवली येथे रात्री रस्त्यावर झाडे उन्मळुन पडली. ही झाडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद कांबळे यांनी सहकाऱ्यांसहित मध्यरात्री तीन वाजल्यापासून बाजूला केली. तसेच रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तर वरवड़े सेंट उसुर्ला हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शनिवारी वाढत्या पावसामुळे सुटी देण्यात आली होती
६१ घरांची पडझड
गेल्या महिनाभरात जिल्ह्याभरातील ६१ घरांची पडझड होऊन सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे., तर सात गोठ्यांची पडझड झाली असून, त्यात ५८ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे.
शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
देवगड : तालुक्यातील जामसंडे येथील तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला प्रतीक राजन ठुकरूल (वय १६, रा. जामसंडे बेलवाडी) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, देवगड पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वृत्त/४

Web Title: Continuous advance in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.