सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; भुईबावडा घाटात दरडी रस्त्यावर, मालवणसह अनेक शहरे जलमय
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 20, 2023 06:23 PM2023-07-20T18:23:12+5:302023-07-20T18:25:16+5:30
घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून मागील तीन दिवसात साडेतीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. संततधार पावसाने उसंत घेतली नसल्याने नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. सखल भागात पाणी साचले असून काही शहरातील घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भुईबावडा घाटात छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.
मुसळधार पावसामुळे अनेक गावातील जुनी मातीची घरे कोसळली आहेत. तर काही ठिकाणी घरांवर आजूबाजूची झाडे पडूनही नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसात सुमारे २० घरांचे आणि ८ ते १० गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
भातशेती पाण्याखाली
नद्यांना पुरपरिस्थिती मुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यात पाऊस कोसळत असल्याने पाणी वाढून ते नदीलगतच्या भातशेतीत घुसत आहे. काही नदीकाठची भातशेती गेले दोन दिवस पाण्याखाली आहे. पुरसद्श स्थिती निर्माण झाल्याने आताच लावणी केली भातरोपे पाण्याखाली गेली आहेत. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकरी बांधवांवर संकटाची टांगती तलवार, तसेव घरांचे नुकसान कायम राहणार आहे.
घरांवर झाडे कोसळून नुकसान
मालवण शहर परिसरात गुरूवारी मुसळधार पावसाने कहरच केला. यामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील देऊळवाडा येथे नागू वळकर हे मोलमजुरी करून राहत असलेल्या कुटुंबाच्या झोपडी वजा घरावर झाड कोसळले.यात घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुकळवाड येथे लवू चिंदरकर यांच्या घराचे पडझडीमुळे नुकसान झाले. याबाबत मालवण महसूल प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे.
मालवण शहर जलमय
मालवण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बसस्थानकासमोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुकाने व घरातही पाणी शिरले. मुसळधार पावसाने मालवण शहरात जलमयस्थिती झाली आहे.