सिंधुदुर्गात पावसाची संततधार; तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर, बांदा आळवाडी परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 19, 2023 12:33 PM2023-07-19T12:33:44+5:302023-07-19T12:34:08+5:30
पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास पूर परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता
बांदा (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच असून आता बहुतांश नदी धोका पातळीवर आल्या आहे. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराच्या पाण्याने बांदा शहरातील आळवाडी परिसराला वेढा दिला आहे.
बांदा आळवाडीतील मच्छिमार्केट येथे मंगळवारी रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंगळवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार पाटील स्वतः बांदा शहरात आलेत. त्यांनी तब्बल दोन तास याठिकाणी थांबून स्थानिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच स्थानिक प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी पुरस्थितीची माहिती जाणून घेतली. शहरातील पूर बाधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली. यावेळी बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तलाठी फिरोज खान, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वच भागात पाणी साचले असून नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास पूर परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे.