कुडाळात पावसाची संततधार, सार्वजनिक विहीर कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:30 AM2020-07-06T10:30:01+5:302020-07-06T10:32:08+5:30
कुडाळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. भंगसाळ नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे. तर गोवेरी पालकरवाडी येथील सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.
कुडाळ : कुडाळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. भंगसाळ नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पुराचा धोका कायम आहे. तर गोवेरी पालकरवाडी येथील सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे.
कुडाळ तालुक्यात गेले तीन-चार दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी भंगसाळ नदीचे पात्र ओसंडून वाहत असल्याने कुडाळ शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, लक्ष्मीवाडी, काळपनाका, भैरववाडी येथील भागात पुराचे पाणी आले होते. तर डॉ. आंबेडकरनगर येथील काही कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले.
शनिवारीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली. मात्र, संततधार सुरूच होती. नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी पूरस्थिती ह्यजैसे थेह्ण अशीच होती. मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे गोवेरी पालकरवाडी येथे २००५ साली बांधण्यात आलेली सार्वजनिक रोजगार योजनेतील शासकीय विहीर कोसळल्याची घटना घडली. या विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, सरपंच, तलाठी, सुषमा गायकवाड तसेच इतर अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी जाऊन पाहणी केली. या विहिरीच्या नुकसानीचा पंचनामा संबंधित विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. पावसाचा जोर तालुक्यात वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आपत्ती कक्षात नोंद
गेल्यावर्षी मुसळधार पावसात सरंबळ येथील डोंगर खचला होता. त्यामुळे तेथील काही घरांना भीती निर्माण झाली होती. शुक्रवारी मुसळधार पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा डोंगर खचण्याची भीती होती. दरम्यान, शुक्रवारी या या डोंगराची पाहणी तहसीलदार अमोल फाटक व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. तसेच तालुक्यात काही घरांचे पत्रे उडण्याच्या, मांगर पडण्याच्या घटनांची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती कक्षात करण्यात आली आहे.