ठेकेदाराचा गोळ्या झाडून खून

By admin | Published: August 30, 2015 11:35 PM2015-08-30T23:35:04+5:302015-08-30T23:35:04+5:30

मृतदेह पोमेंडी रेल्वे पुलाखालील गटारात : पैशाच्या व्यवहारातून खूून झाल्याचा संशय

The contractor killed the bullets | ठेकेदाराचा गोळ्या झाडून खून

ठेकेदाराचा गोळ्या झाडून खून

Next

रत्नागिरी : तालुक्यातील कारवांचीवाडी येथे एका तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ७.४५ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अभिजीत शिवाजी पाटणकर (२६, सन्मित्रनगर, रत्नागिरी) असे मृत तरुण ठेकेदाराचे नाव आहे. त्याच्या डोक्यावर एक तर छाती व पोटावर तीन अशा एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. कारवांचीवाडी - पोमेंडी येथील रेल्वे पुलाच्या खालील रस्त्याच्या गटारात त्याचा मृतदेह आढळून आला. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाला असावा, असा संशय आहे. अभिजीतच्या खुनामागील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मृत तरुणाच्या घरच्यांकडून गेल्या दोन दिवसांतील घटनाक्रमाची माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. अभिजीत हा रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे कुटुंबियांसह राहत होता. शनिवारी रात्री तो घरी आला नव्हता. त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो सापडू शकला नाही. त्यामुळे अभिजीतचे कुटुंबीय चिंतेत होते.
आज (रविवार) सकाळी कारवांचीवाडी - पोमेंडी येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या गटारात तरुण पडलेला असल्याची माहिती पोलीसपाटीलांनी दिल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थिटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी उशिरा अभिजीतची उत्तरीय तपासणी झाली. पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले वडील शिवाजी पाटणकर यांना त्यांच्या ठेकेदारीच्या कामात अभिजीत हा मदत करीत असे. लहान-मोठी कंत्राटेही तो घेत असे. लांजा तालुक्यातील कुरंग येथील धरणाच्या कामातही तो वडिलांना मदत करीत. अभिजीतला शनिवारी रेल्वेस्थानकावर कोणी बोलावून नेले होते काय? तेथून त्याला दुचाकीनेच पोमेंडीत नेले गेले की कारने नेले? त्याच्यासोबत कोण होते? कारवांचीवाडी येथील पुलाखालीच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या की, अन्य ठिकाणी आधीच गोळ्या झाडून नंतर त्याचा मृतदेह पोमेंडी पुलाखालील गटारात टाकण्यात आला? की हल्लेखोरांपैकीच कोणीतरी त्याची दुचाकी स्थानकावर ठेवून ते रेल्वेने पसार झाले का? हत्या करणारे हे स्थानिक आहेत की जिल्ह्याबाहेरील आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)


तीन महिन्यांपूर्वी धक्काबुक्की ?
अभिजीतचे वडील पाटबंधारेमध्ये वरिष्ठ अधिकारीपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे अभिजीत कोणाचे पैसे देणे असेल ही शक्यता नाही. मात्र, तीन महिन्यांपूर्वी पोलीस खात्यातीलच एका कर्मचाऱ्यासमोर अभिजीतला धक्काबुक्की झाली होती व त्यावेळी दोन तरुणही उपस्थित होते, असे अभिजीतच्या घरच्यांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याची वरिष्ठांनी आज झाडाझडती घेतल्याचीही चर्चा आहे. तसेच काही संशयितांची चौकशीही सुरू आहे.


पूजेसाठी विड्याची पाने आणायला गेला..
अभिजीतच्या घरी रविवारी सकाळी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची तयारी करण्यात तो मग्न होता. पूजेसाठी विड्याची पाने आणण्यासाठी तो शनिवारी सायंकाळी ७ वाजता घराबाहेर गेला. मात्र घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्याच्या मित्रांकडेही चौकशी करण्यात आली. शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही.


दुचाकी स्थानकावर...
अभिजीतची दुचाकी कुवारबाव येथील रत्नागिरी रेल्वेस्थानकाबाहेर आढळून आली. दोन वर्षांपूर्वी ठेकेदार भय्या, स्वप्नील मोरे याची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह चंपक मैदानाजवळ व गाडी रेल्वेस्थानकाजवळ आढळली होती. अभिजीतची हत्या झाल्यानंतरही मृतदेह पोमेंडी येथे, तर दुचाकी रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ सापडली आहे. याचे आश्चर्य आहे.

Web Title: The contractor killed the bullets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.