लोकशाही सुदृढतेसाठी योगदान देऊया - के. मंजूलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:02 PM2019-04-05T18:02:13+5:302019-04-05T18:02:59+5:30
प्रत्येकाच्या मताची किंमत अमुल्य आहे. मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो या वृत्तीला मनात थारा न देता येत्या २३ एप्रिल रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढतेसाठी योगदान
सिंधुदुर्गनगरी : प्रत्येकाच्या मताची किंमत अमुल्य आहे. मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो या वृत्तीला मनात थारा न देता येत्या २३ एप्रिल रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढतेसाठी योगदान देण्याचा आज संकल्प करुया असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या सह अध्यक्षा के. मंजुलक्ष्मी यांनी माणगाव (ता. कुडाळ) येथे बोलताना केले.
कुडाळ पंचायत समितीच्यावतीने मतदार जागृतीसाठी भव्य रॅलीचे माणगाव येथे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या उद्घाटनपर सोहळ्यात के.मंजुलक्ष्मी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या संमारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, संतोष जिरगे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माणगाव तिठा ते माणगाव बाजारपेठ असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत साळगाव हायस्कूलचे ढोल पथक, लेझिम पथक, दशावतारी कलाकारांचा चित्ररथ, बचत गटाच्या, आशा सेविका पथक, महिला व पुरुष यांची मोटार सायकल रॅली यांचा समावेश होता. या रॅलीत व उद्घाटन समारंभत माणगाव पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.
आपले एक मत ही अत्यंत महत्वाचे
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी या प्रसंगी बोलताना मिझोराम राज्यातील दुर्गम प्रदेशात केवळ एका व्यक्तीच्या मतदानासाठी मतदान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी आठ किलोमीटर ट्रेकिंग करत त्या मतदाराचे मतदान घेतात असे उदाहरण देऊन ते म्हणाले प्रत्येक मत अमुल्य आहे. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आकर्षक पथनाट्य व दशावतारी नाटीकेस रसिकांची उत्स्फूर्त दाद
मतदार जागृती उद्घाटन समारंभ प्रसंगी साळगाव हायस्कूलच्या मुला-मलींनी मतदार जागृतीबाबत आकर्षक पथनाट्य सादर केले. तसेच यानंतर आरोग्य सेवेतील कर्मचारी यांनी दशावतार नाटीका सादर केली. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.