१ जूनपासून नियंत्रण कक्ष
By Admin | Published: May 20, 2015 10:25 PM2015-05-20T22:25:18+5:302015-05-21T00:03:58+5:30
गुरूनाथ पेडणेकर : जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा
सिंधुदुर्गनगरी : अत्यावश्यक रुग्णसेवा १०८ अंतर्गत अजून २ रुग्णवाहिकांची (अॅम्ब्युलन्स) मागणी आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आल्याची तर १ जूनपासून जिल्हास्तरावर व तालुक्यात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी बुधवारी सभेत दिली.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, संग्राम प्रभुगावकर, निकिता जाधव, कल्पिता मुंज, भारती चव्हाण, समिती सचिव व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत अत्यावश्यक रुग्ण सेवा १०८ सेवा देशात सुरु आहे. या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. रुग्णवाहिकांमुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अत्यावश्यक रुग्णसेवा १०८ या सेवेचा जिल्ह्यातील रुग्णांना होणारा फायदा व आवश्यकता पाहता आणखी दोन रुग्णवाहिका जिल्ह्याला मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली असून तसा प्रस्तावही आरोग्य उपसंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. तसेच पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याच धर्तीवर कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर व तालुक्यात १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी सभेत दिली. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र पणदूर या आरोग्यकेंद्रात करण्यात आलेले लाईट फिटींगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यासाठी जुने साहित्य वापरले असल्याचा आरोप सभापती पेडणेकर यांनीच सभेत करत संबंधित ठेकेदारांना बिल अदा करू नये व त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना
दिले. (प्रतिनिधी)
सदस्यांना किंमत नाही?
हिर्लोक प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या सभागृह बांधकामासंदर्भात विषय चर्चेत आला असता सदस्या निकिता जाधव आक्रमक होत संबंधित विषय दोन वर्षे सभागृहात सुरु आहे त्याचे गांभिर्य ओळखून सभागृहाचे बांधकाम एवढ्यात पूर्ण झाले होते असे सांगत सभागृहाच्या बांधकामास एवढा वेळ लावत असल्याने व सदस्यांच्या मुद्यांवर कोणी लक्ष देत नसल्याने सदस्यांना किंमत आहे की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.