भुयारी गटारावरून वादंग

By admin | Published: December 20, 2014 11:23 PM2014-12-20T23:23:25+5:302014-12-20T23:23:25+5:30

भुयारी गटार योजन नियोजनशून्य

The controversy over the subway | भुयारी गटारावरून वादंग

भुयारी गटारावरून वादंग

Next

मालवण : नगरपालिकेची शनिवारची मासिक सभा भुयारी गटार योजनेच्या नियोजनशून्य कामाच्या विषयावरून चांगली गाजली. नागरिक व व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी मुख्याधिकारी व प्रशासनास फैलावर घेतले. भुयारी गटाराचे काम संबंधित ठेकेदाराने योग्य पद्धतीने व लवकर पूर्ण न केल्यास ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी मागणी यावेळी सुदेश आचरेकर यांनी केली. नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना देवून काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.
सभा नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मालवणवासीयांच्या डोकेदुखी ठरलेल्या भुयारी गटारच्या कामाबाबत जोरदार चर्चा झाली. जावकर यांनी या प्रश्नावर झोड उठविली. प्रशासनाला जाब विचारला .
एकाचवेळी शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर खोदाई सुरू केल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठ रस्ता भुयारी गटाराच्या कामामुळे गेला एक महिना वाहतुकीस बंद आहे. ऐन पर्यटन हंगामात हा रस्ता बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच खोदलेले रस्ते बोल्डर न टाकता केवळ मातीने बुजविण्यात आले असून त्यावरच डांबरीकरण केल्यास भविष्यात हे रस्ते खचतील. त्याचप्रमाणे भुयारी गटाराबरोबरच बीएसएनएलची लाईन टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात येत असून त्यांचीही तीच गत आहे. रस्ते खराब झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कामावर नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. अशी टीका जावकर यांनी केली. जावकर यांच्या विधानात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही दुजोरा देत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांना भुयारी गटार कामामुळे होणाऱ्या त्रासाबाबत नगरपालिकेच्यावतीने आचरेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या भुयारी गटार ठेकेदाराला बाजारपेठ मुख्यरस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम त्वरित हाती घेण्याच्या सूचना नगराध्यक्ष तोडणकर यांनी केल्या.
शहरातील नागरिकांना आवश्यक सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन असमर्थ असेल तर नागरिकांची २५ टक्के घरपट्टी माफ करावी. अशी मागणी जावकर यांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी, जॉन नऱ्होना, महेंद्र म्हाडगुत, रवीकिरण आपटे, सेजल परब, रेझीना डिसोजा, पुजा करलकर, शिल्पा गिरकर, स्नेहा आचरेकर, महानंदा खानोलकर, ममता वराडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: The controversy over the subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.