उरल्यासुरल्या राष्ट्रवादीत वादावादी

By Admin | Published: April 17, 2015 10:36 PM2015-04-17T22:36:59+5:302015-04-18T00:05:10+5:30

कोकण किनारा

Controversy in the remaining NCP | उरल्यासुरल्या राष्ट्रवादीत वादावादी

उरल्यासुरल्या राष्ट्रवादीत वादावादी

googlenewsNext

कुठलाही राजकीय पक्ष म्हटला की, त्यात थोड्याफार कुरबुरी असतातच. एकाचवेळी सगळे समाधानी होऊ शकत नाहीत. पण त्या कुरबुरी जेव्हा एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यापर्यंत मजल गाठतात, तेव्हा त्याचं स्वरूप गंभीर आहे, हे लक्षात येते. त्यातही जेव्हा पक्षाची हालत गंभीर असते, अशावेळी वैयक्तिक किंवा खालच्या स्तरावरची टीका एकमेकांवर केली जाते, तेव्हा तो पक्ष लवकरच फुटणार, हेही स्पष्ट होते. रत्नागिरीतल्या राष्ट्रवादीतही सध्या तेच सुरू आहे. मुळात विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी झाली आहे. मात्र, आता जोमाने पक्ष वाढवण्याऐवजी आणि कार्यकर्त्यांना एकत्र करण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यातच राष्ट्रवादीचे नेते मग्न झाले आहेत. त्यामुळे कुठलंही यश मिळाले नसले तरी राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.१९९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले. हनिमून संपेपर्यंत वातावरण आलबेल होते. पण, प्रत्यक्ष संसाराला सुरूवात झाल्यानंतर मात्र वादावादीला सुरूवात झाली. २00४च्या निवडणुकीत रत्नागिरी आणि चिपळूणला राष्ट्रवादीचे आमदार झाले. त्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जिल्ह्याबाहेरील नेत्यांकडेच होते. त्यामुळे थेट वादाचे मुद्दे आले नाहीत. पण, तरीही पक्ष वाढत असल्याने गटबाजी वाढायला लागली.सर्वात मोठे उघड वाद सुरू झाले ते २00९च्या विधानसभा निवडणुकीनंतर. या निवडणुकीत उदय सामंत दुसऱ्यांदा आमदार झाले आणि गुहागर मतदार संघातून भास्कर जाधव प्रथमच राष्ट्रवादीतर्फे विधानसभेत गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पुन्हा सत्ता मिळाली. त्यामुळे दुसऱ्यांदा आमदार झालेले उदय सामंत हेच पालकमंत्री होणार, अशी अटकळ सामंत समर्थकांनी बांधली. पण प्रत्यक्षात भास्कर जाधव यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे सामंत विरूद्ध जाधव हा संघर्ष सुरू झाला. आधी शीतयुद्ध होते आणि मग तो उघड संघर्ष झाला. जाधव पालकमंत्री असेपर्यंत उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका टाळल्या आणि पुढे सामंत पालकमंत्री झाल्यानंतर जाधव यांनी तेच केले.सामंत-जाधव हा संघर्ष जुना झाला असला तरी त्यावेळी तयार झालेले गटातटाचे राजकारण अजूनही काही प्रमाणात सुरू आहे. २00५मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे तेव्हापासून शिवसेना काहीशी हतबल, निर्नायकी झाली होती. २0१४च्या लोकसभा निवडणुका येईपर्यंत शिवसेनेची स्थिती फारशी सुधारत नव्हती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ चांगली झाली. रत्नागिरीत उदय सामंत आणि गुहागरात भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी चांगली वाढवली. जाधव यांनी गुहागरबरोबरच चिपळूणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले वजन मिळवून दिले. जिल्ह्यातील सर्वात ताकदवान शिवसेना हतबल आणि निर्नायकी होत असताना सर्वात मोठी वाढ राष्ट्रवादीचीच झाली. खरं तर तिथून या पक्षाला खूप मोठी झेप घेता आली असती. पण जिल्हास्तरावर सुरू असलेल्या वादावादीत आणि गटबाजीत कार्यकर्ते एकमेकांपासून तुटत गेले आणि संधी असूनही राष्ट्रवादीच्या वाढीला मर्यादा आल्या. रमेश कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष तसेच उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी प्रदेश पातळीवरून केलेले प्रयत्न खूपच उशिरा झाले आणि ते प्रयत्नही यथातथाच होते. तोपर्यंत कार्यकर्त्यांची मने दुभंगली होती. त्यामुळे २0१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागांवर यश मिळाले असले तरी मानसिकदृष्ट्या राष्ट्रवादी मागे गेली आणि गेल्या निवडणुकीइतक्याच तीन जागा मिळवलेल्या शिवसैनिकांचा उत्साह दुणावला.
उदय सामंत २00९च्या निवडणुकीत आठ हजाराच्या फरकाने विजयी झाले होते. २0१४ला त्यांनी आयत्या वेळी शिवसेनेत प्रवेश करूनही तब्बल ५३ हजारांच्या फरकाने विजय मिळवला. शिवसेनेच्या मतांबरोबरच राष्ट्रवादीतील मतेही त्यांनी आपल्या बाजूने वळवली. म्हणजेच राष्ट्रवादीच्या खात्यात दापोलीची भर पडली असली तरी रत्नागिरीत राष्ट्रवादी मागे गेली.
आता उरल्यासुरल्या राष्ट्रवादीत पुन्हा नव्याने वादावादी सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्यावर जोरदार टीका केली. चोरगे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यावर पुन्हा कदम यांनी हल्ला चढवला. त्याला पुन्हा चोरगे यांनी उत्तर दिले. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाविरोधात प्रचार करण्याचे शिवसेनेचे बहुतांश काम रमेश कदम यांनी पार पाडल्याने शिवसेना नेत्यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. आता पुढची वादावादी त्या विषयावरून सुरू झाली आहे. कुमार शेट्ये, रमेश कदम हे दोन्ही नेते आपापला काळ गाजवलेले आहेत. खरं तर पडत्या काळात पक्षाला उभारी देण्याची मोहीम हाती घेण्यापेक्षा त्यांच्या आरोप-प्रत्यारोपातून राष्ट्रवादीची अवस्था अधिकच दयनीय होऊ लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजही राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पण सध्याची वादावादी लक्षात घेता पक्षाचा हा क्रमांक घसरण्याची शक्यता अधिक आहे. गुहागरचा गड मजबूत करणाऱ्या भास्कर जाधव यांनी या वादात कोणतीही भूमिका न घेऊन आपल्या राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. पण इतर नेत्यांनी मात्र वाद रस्त्यावर आणून राष्ट्रवादीला चांगलाच हादरा दिला आहे. उदय सामंत शिवसेनेत गेल्यामुळे रत्नागिरीतील राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली आहे. ती सावरण्यापेक्षा नवीन पदाधिकाऱ्यांना वादांकडेच पाहावे लागत आहे. आता हेच ‘संस्कार’ घेऊन ते पुढे जाणार आहेत. -- मनोज मुळ््ये

Web Title: Controversy in the remaining NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.