जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांचा पोरखेळ

By Admin | Published: August 29, 2016 12:42 AM2016-08-29T00:42:24+5:302016-08-29T00:42:24+5:30

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कशी घडणार सिंधू, कधी घडणार साक्षी?

Convenience of District Sports Complex | जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांचा पोरखेळ

जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांचा पोरखेळ

googlenewsNext

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी
रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या सिंधू व साक्षी मलीक प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा नक्कीच केली जाते. मात्र, साक्षी आणि सिंधू तयार होण्यासाठी कोणत्याच सुविधा वा सोयी नसल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय क्रीडादिनी मन विषण्ण करून जाते. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय क्रीडा संकुलात सुविधांची वानवा आणि क्रीडाक्षेत्र वाढावे, अशी मानसिकताच नसलेले अधिकारी, कर्मचारी यामुळे या क्रीडा संकुलात येणाऱ्या क्रीडापटूंसाठी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही.
जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे खेळाडू आणि त्यांच्या पालकांशिवाय कुणीच फिरकत नाही, अगदी आमदार, खासदारसुध्दा नाहीत. त्यामुळे या कार्यालयाला मिळणाऱ्या निधीचा विनियोग कसा केला जातो, याची गणितं मांडण्याचा प्रश्नच येत नाही. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाजूलाच जिल्हा शासकीय क्रीडा कार्यालय व क्रीडा संकुल आहे. त्यामुळे क्रीडा संकुलात सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचं राज्य झालं आहे. या संकुलात असलेल्या सुविधा न सांगण्यापलिकडच्या आहेत.
जिल्हा शासकीय कार्यालयातील मुलींच्या प्रसाधनगृहात अतिशय अस्वच्छता आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना चक्क नागरी वस्तीतून पाणी मागून आणावे लागते. या संकुलात महिला खेळाडूंसाठी एक चेंजिंग रूम आहे. चेंजिंग रूममध्ये तीन प्रसाधनगृह व तीन शौचालये आहेत. मात्र, चेंजिंग रूममध्ये प्रचंड अडगळ आहे. खेळासाठी वापरण्यात येणारे मॅट एकावर एक रचण्यात आले आहेत. शिवाय मोडके स्टूल्स, खुर्च्या, मोडक्या फ्रेम्स यांची अडगळ आहे. पूर्ण गंजलेले, मोडकळीस आलेले कपाटही आहे. त्याच्या बाजूलाच रद्दीचा ढिगारा लावण्यात आला आहे. परिणामी महिला खेळाडूंना कपडे चेंजिंगसाठी पुरेशी जागा नाहीच, उलट चिखल आणि घाणीचे पाय घेऊन यावे लागत असल्यामुळे संपूर्ण रूमभर अस्वच्छता पसरते. महिला खेळाडूंचे सामान ठेवण्यासाठी सुरक्षित जागा नाही. खिडक्यांची तावदाने तुटलेली असल्यामुळे झाडांच्या वेली खिडकीत डोकावताना दिसतात. वर्षोनवर्षे याठिकाणी सफाईच केलेली नसल्याचे दिसून येते. शौचालये, बाथरूममधील नळ नादुरूस्त असल्यामुळे पाणी कमी दाबाने येते. दररोज स्वच्छता न केल्यामुळे याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.
संकुलातील महिला रूममध्ये विजेची असुविधा आहे. ट्युबलाईट नाही, शिवाय विजेचा बोर्ड तुटला असून, वायरच्या आधाराने लोंबकळत आहे. छत गळत असल्याने रात्रंदिवस पाणी ठिबकत असते. त्यामुळे डोक्यावर छप्पर असूनही पावसाळ्यात याठिकाणी तिन्ही महिने पाऊस सुरु असतो.
जिल्हा क्रीडा संकुलात बॅडमिंटन हॉल, व्यायामशाळाही आहे. बॅडमिंटन हॉलमध्ये व्हेंटीलेशन होत नसल्यामुळे प्रचंड उकाडा होतो. तांत्रिक गोष्टींचा अभाव असल्यामुळे ध्वनीक्षेपकाचा आवाज घुमतो, गॅलरीत तर ऐकूच येत नाही. जिल्हा क्रीडा कार्यालय संकुलाच्या लगत असूनसुध्दा सुविधांबाबत प्रशासनाची प्रचंड उदासीनता आहे. जिल्ह्यात महिला राष्ट्रीय खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू मजल मारीत आहेत, अशा खेळाडूंना नुसतेच प्रोत्साहन देऊन भागणार नाही, तर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे पध्दतशीर डोळेझाक केली जात आहे. दरवर्षी जिल्हा क्रीडा कार्यालयाला निधी येतो. या निधीचा विनियोग नेमका कोठे केला जातो. महिला खेळाडूंना खेळाच्या वेळी पुरेशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींची डोळेझाक होत आहे.
वजन शौचालय, प्रसाधनगृहात
जिल्हा क्रीडा संकुलात वजनी गटाच्या स्पर्धादेखील घेण्यात येतात. वजनी गटाच्या स्पर्धेसाठी खेळाडूंचे वजन केले जाते. मात्र, वजन करण्यासाठी जागाच नसल्यामुळे चक्क कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शौचालय, प्रसाधनगृहात हे वजन घेतले जाते. जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या या दुरवस्थेचे विदारक चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.
पिण्यासाठी थेंबभर पाणीही नाही...
क्रीडा संकुलात बाकीच्या सुविधा नाहीतच; पण खेळाडूंना कधीही लागू शकते, ते पिण्याचे पाणीही नाही. बॅडमिंटनसारख्या हॉलमध्ये जेव्हा स्पर्धा होतात, त्यावेळी एका व्यक्तिला किमान तीन-चार बाटल्या पाणी लागते. मात्र, संकुलात पाणी नसल्यामुळे नागरी वस्तीतून पाणी मागून आणावे लागते. लोकवस्तीतील काही नागरिक पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात. आम्हीच पाणी विकत आणलेय तुम्हाला कुठले देणार, असे सांगून पाणी देण्यास चक्क नकार देतात, परिणामी खेळाडूंना १०० ते १२० रूपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पाणी बाहेर जाऊन घ्या, अशी बेफिकीरीची उत्तरे येथील कर्मचारीवर्ग देतो. विशेष म्हणजे क्रीडा खात्याकडे कुणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने निधी येतो कुठे, जातो कुठे, याबाबत साराच सावळागोंधळ सुरु आहे.

Web Title: Convenience of District Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.