‘सहकार’ने शिवसेनेला बेसावध ठेवून फसविले

By admin | Published: June 17, 2015 10:10 PM2015-06-17T22:10:03+5:302015-06-18T00:44:39+5:30

बाळा कदम : चिपळूण अर्बन निवडणुकीनंतरचे कवित्व कायम

'Cooper' deceived Shivsena by keeping it silent | ‘सहकार’ने शिवसेनेला बेसावध ठेवून फसविले

‘सहकार’ने शिवसेनेला बेसावध ठेवून फसविले

Next

चिपळूण : अर्बन बँकेच्या निवडणुकीत शिवसेना - भाजप स्वतंत्र पॅनेल उभे करणार होती. आमची तशी तयारी होती. परंतु, सहकार पॅनेलतर्फे शिवसेनेला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. बँकेचा निवडणुकीचा ३० लाख रुपये खर्च टळावा व सहकारात राजकारण नको, यासाठी आम्ही त्यांना होकार दिला. परंतु, अखेरच्या क्षणी आम्हाला बेसावध ठेवून त्यांनी आमची फसवणूक केली, असा आरोप विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केला.
शिवसेनेतर्फे आज (बुधवारी) सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेवर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बँकेच्या बाबतीत आम्ही कोणताही आततायीपणा केलेला नाही. शेवटपर्यंत आम्ही पॅनलमध्ये जाण्यासाठी वाट पाहिली. पण, आमच्याच काही सहकाऱ्यांनी गद्दारी केली. त्यामुळे सहकार पॅनेलने आमच्यातील बेदिलीचा फायदा उचलला. त्यांचा डाव आम्ही ओळखू शकलो नाही. तरीही शेवटच्या आठ दिवसात आमचे एकमेव उमेदवार समीर टाकळे यांना १७६० मते मिळाली आहेत. हा आमचा नैतिक विजय आहे. त्यामुळे मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगर पालिकेतील गटनेते नगरसेवक राजू कदम, नगरसेवक शशिकांत मोदी, विभागप्रमुख समीर टाकळे, उमेश सकपाळ, मनोज शिंदे, भय्या कदम, तालुका युवा अधिकारी संदेश आयरे, राकेश देवळेकर, यतीन कानडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, शालिग्राम विखारे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेमुळे बँकेला भुर्दंड सोसावा लागू नये व निवडणूक टळावी, यासाठी आम्ही आमचे दोन उमेदवार द्यायला तयार झालो. आमच्याकडे सुचित्रा खरे, समीर टाकळे, संदीप साडविलकर यांची नावे आली होती. यापैकी दोघांना संधी देण्याचे नक्की झाले. सुरेखा खेराडे यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला होता. पॅनेलमध्ये गेल्यास आपण पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, अखेरच्या क्षणी खरे व विखारे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यावेळी सहकार पॅनेलने एकही अर्ज मागे घेतला नाही. खेराडे यांच्याशी त्यांची चर्चा होती, तर त्यांनी खेराडे यांना संधी द्यायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही. आम्हाला समीर टाकळेंच्या माध्यमातून संधी देणे अपेक्षित होते. पण, तिही दिली गेली नाही. त्यामुळे शिवसेनेची व खेराडे यांचीही सहकार पॅनेलच्या नेत्यांनी फसवणूक केली आहे. आता ते नाहक कंगावा करीत आहेत. त्यांनी देवासमोर उभे राहून खरे काय ते सांगावे, असे कदम यांनी स्पष्ट केले.
पक्षातील ज्या गद्दारांमुळे या निवडणुकीत गोंधळ झाला, त्या सर्वांची माहिती आमच्याकडे आहे. ही कीड नगर परिषद निवडणुकीपूर्वी ठेचावी लागेल, अन्यथा नगर परिषद निवडणुकीतही आम्हाला ती अडचणीची ठरेल. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे करणार आहोत, असेही कदम यांनी सांगितले.
माजी आमदार बापूसाहेब खेडेकर हे सहकार पॅनेलचे प्रमुख होते. पण, त्यांनीही आमची बाजू मांडली नाही, अशी खंत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

गद्दारी मूळावर येईल...
अर्बन बँक निवडणुकीत दोन जागा मिळाल्या काय किंवा नाही मिळाल्या काय हा प्रश्न नाही. पण ज्यांनी गद्दारी केली ती किड नगर परिषदेत शिवसेनेच्या मुळावर येईल. त्याची दखल वरिष्ठांनी घ्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे बाळा कदम यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: 'Cooper' deceived Shivsena by keeping it silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.