corona cases in Sindhudurg : कणकवलीत डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने सतर्कता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 06:23 PM2021-06-24T18:23:36+5:302021-06-24T18:25:24+5:30
corona cases in Sindhudurg : कणकवली शहरातील परबवाडी येथे एका कॉम्प्लेक्समध्ये राहणारी व्यक्ती तपासणीअंती डेल्टा प्लस कोविड रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्या तो सक्रिय रुग्ण नसून उपचाराअंती तो बरा देखील झाला आहे. मात्र, नगरपंचायतीने त्या अनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे.
कणकवली : शहरातील परबवाडी येथे एका कॉम्प्लेक्समध्ये राहणारी व्यक्ती तपासणीअंती डेल्टा प्लस कोविड रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्या तो सक्रिय रुग्ण नसून उपचाराअंती तो बरा देखील झाला आहे. मात्र, नगरपंचायतीने त्या अनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे.
संबंधित कॉम्प्लेक्समधील सुमारे १४० पेक्षा जास्त लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या भागात कंटेन्मेंट झोनदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोविड संदर्भातील नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
शहरात डेल्टा प्लसचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर नलावडे, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, गटनेते संजय कामतेकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सतीश टाक, आरोग्य सेविका भाट, माजी नगरसेवक बंडू गांगण, नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, ध्वजा उचले व आरोग्य विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी त्या कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी भेट दिली.
५० मीटर अंतरात कंटेन्मेंट झोन करणार
नगराध्यक्ष नलावडे, तहसीलदार पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या स्वॅब कलेक्शनच्या कामाची माहिती घेतली. त्या कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी स्वॅब कलेक्शनसाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे. या कॉम्प्लेक्समधील सर्व लोकांचे स्वॅब तपासणी करण्यात येणार असून, या भागात पन्नास मीटरच्या अंतरात कंटेन्मेंट झोनदेखील करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.
तहसीलदारांकडून आढावा
तहसीलदार आर. जे. पवार यांनी याठिकाणी उपस्थित राहत आढावा देखील घेतला. डॉ. संजय पोळ यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. डेल्टा प्लसचा कोविड रुग्ण जरी सापडला असला तरी तो रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा झाला आहे. मात्र, नागरिकांनी नियमित मास्क वापरणे व कोविड संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. पोळ यांनी केले आहे.