corona cases in Sindhudurg : आरोग्य सेवेत सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 03:54 PM2021-06-23T15:54:43+5:302021-06-23T15:56:04+5:30
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या काळात पूर्णतः कोलमडली असून, त्याविरोधात कणकवली तालुका भाजपच्यावतीने सरकार, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांचे ...
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या काळात पूर्णतः कोलमडली असून, त्याविरोधात कणकवली तालुका भाजपच्यावतीने सरकार, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. हे आंदोलन प्राथमिक स्वरूपाचे असून, जर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन भाजपकडून उभारण्यात येईल, असा इशारा भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे व मिलिंद मेस्त्री यांनी दिला.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या लक्षवेध आंदोलनात तालुकाध्यक्ष संतोष कानडे , मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, माजी सभापती प्रज्ञा ढवण, सोनू सावंत, महेश गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, शिशिर परुळेकर, कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, समीर प्रभुगावकर, सदा चव्हाण, संतोष पुजारे, भाजपा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, नितीन पाडावे, समर्थ राणे, अजय घाडी, बाळा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
सात महिने पगार नसतील तर काय कामाचे ?
यावेळी ''पालकमंत्री हाय, हाय, या पालकमंत्र्यांचा करायचे काय?, आघाडी सरकारचा निषेध असो'' , अशा अनेक घोषणा देत पालकमंत्री व राज्य सरकारचा भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. जिल्ह्यात भाजपाकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्यानंतर आतापर्यंत चार फिजिशियन दाखल झाले आहेत. मात्र आमचे आंदोलन हे तात्पुरते नाही तर दीर्घकाळ चालणार असून, जोपर्यंत आरोग्य व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत भाजपा मागे हटणार नाही असा इशारा कानडे व मेस्त्री यांनी दिला. आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांना वेळेत पगार हे दिलेच पाहिजेत. कोरोनाशी हे लोक दोन हात करत असताना त्यांना जर सात महिने पगार मिळत नसतील तर सरकार काय कामाचे ? असा सवाल कानडे यांनी केला.