आंबोलीच्या पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण, सलग दुसऱ्या वर्षी फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:20 PM2020-07-01T12:20:23+5:302020-07-01T12:24:54+5:30
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचप्रमाणे ते आंबोलीतही लागू झाले. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये आंबोलीतील पर्यटन पूर्णपणे बंद झाले.
महादेव भिसे
आंबोली : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचप्रमाणे ते आंबोलीतही लागू झाले. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये आंबोलीतील पर्यटन पूर्णपणे बंद झाले.
निदान पावसाळ्यात तरी वर्षा पर्यटनाला प्रशासन मंजुरी देईल, अशी येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना आशा होती. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव पाहता ही परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आंबोलीत रविवारपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर पोलीस तैनात करण्यात आले असून धबधब्यावर जाण्यास प्रशासनाकडून आधीच बंदी घालण्यात आली आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे घाटात दरड कोसळून तसेच कोल्हापूर, बेळगाव, पुणे, मुंबई महामार्ग अतिवृष्टीमुळे बंद झाल्याने आंबोलीतील वर्षा पर्यटन झालेच नव्हते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाचे गतवर्षी मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही वर्षा पर्यटन होणार नाही अशी चिन्हे असल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे वर्षा पर्यटनाचे तीन महिने वाया गेले होते. त्यानंतर जेमतेम महिनाभर हिवाळी पर्यटन हंगामाचा व्यवसाय येथील व्यावसायिकांनी केला होता. त्यानंतर लगेचच कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण पर्यटन व्यवसाय बंद करण्यात आला.
मे महिना हा येथील प्रमुख पर्यटन हंगामांपैकी एक हंगाम असतो. तोही होऊ शकला नाही. तसेच येत्या काळात वर्षा पर्यटनालासुद्धा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
गतवर्षी वर्षा पर्यटनाचे तीन महिने अतिवृष्टीमुळे वाया गेले होते तर यावर्षी कोरोनामुळे मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने येथील व्यवसाय होऊ शकला नाही. तसेच वर्षा पर्यटन हंगामाचे चार महिने असे एकूण नऊ महिने आंबोलीतील पर्यटन व्यवसाय एकही रुपयाची उलाढाल न होता बंद राहणार आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
येथील बऱ्याच व्यावसायिकांनी लाखो रुपयांची कर्जे घेऊन पर्यटन व्यवसाय सुरू केले आहेत. मोठमोठी हॉटेल्स, ग्रामीण कृषी पर्यटनासाठी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्यामुळे त्यांना एक वेगळीच चिंता सतावू लागली आहे. नऊ महिने व्यवसाय करू शकलो नसल्यामुळे बँका आपल्या व्यवसायावरती जप्ती तर आणणार नाहीत ना? अशी चिंता या व्यावसायिकांना सतावत आहे.
२०१९ ते २०२० या वर्षभराच्या कालावधीत येथील पर्यटन व्यावसायिकांना तब्बल नऊ महिने पर्यटन व्यवसायाला मुकावे लागले आहे. बँकांचे हप्ते, लाईट बिल, पाणी बिल कसे भरायचे हा प्रश्न या व्यावसायिकांसमोर आ वासून उभा आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना येत्या काळात निदान वर्षभर तरी बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. कर्जांवरील व्याजदर वर्षभरासाठी माफ करावेत, अशी मागणी होत आहे.
तसेच व्यावसायिक तत्त्वावर आकारले जाणारे पाणी बिल व लाईट बिल माफ करण्यात यावे अशी मागणीही होत आहे. येथील पर्यटन जरी सुरू झाले तरी ते स्थिरावण्यास बराच काळ लागणार आहे. पर्यटनस्थळांवरील व्यावसायिकांना प्रशासनाने या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आता गरजेचे बनले आहे.
विषाणूच्या फैलावाची भीती
वर्षा पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भीती प्रशासनाला असून त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.
दिलासा देण्याची मागणी
आंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढली आहेत. या बँकांनी तगादा लावू नये. तसेच व्यावसायिक तत्त्वावर आकारल्या जाणाऱ्यां लाईट बिल, पाणी बिल याबाबत इतर ठिकाणांपेक्षा वेगळे निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी येथील पर्यटन व्यावसायिकांमधून होत आहे.
व्यावसायिकांची उपासमार
पर्यटन व्यवसायामध्ये बरेच तरुण नवनवीन उपक्रम हाती घेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. वडापावच्या गाड्या, चहाच्या टपºया अशा हातावरचे पोट असलेल्या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
बाजारपेठ ओस : व्यावसायिकांचे हाल
आंबोलीतील प्रमुख व्यवसाय हा पर्यटन असून सध्या येथील बाजारपेठ ओस पडली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता जवळपास १७ ते १८ मोठी हॉटेल्स बंद आहेत. साठच्या आसपास उपहारगृहेही पूर्णपणे बंद आहेत.
आंबोलीच्या पर्यटनाचा आर्थिक कणा म्हणून वर्षा पर्यटनाकडे पाहिले जाते. परंतु गतवर्षी अतिवृष्टीमुळे व यावर्षी कोरोना संक्रमणामुळे वर्षा पर्यटन होऊ शकले नाही. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक अडचणीत आला आहे.
- विलास गावडे,
उपसरपंच तथा पर्यटन व्यावसायिक,आंबोली
आम्ही लक्षावधी रुपयांची कर्जे काढून व्यवसाय सुरू केले. परंतु गेल्या पावसाळ्यापासून तब्बल नऊ ते दहा महिने व्यवसाय बंद असून शासनाने आम्हांला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जावरील व्याज वर्षभरासाठी माफ करावे.
- अनिल नार्वेकर,
पर्यटन व्यावसायिक, आंबोली
हातावरचे पोट असलेला आमचा व्यवसाय बंद असल्याने आम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहोत. प्रशासनाने आमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी ठोस निर्णय घेऊन आम्हांला दिलासा द्यावा.
- रमेश मोहिते,
वडापाव विक्रेते