खातरजमा न करता कोरोनाचे चुकीचे वृत्त : सिंधुदुर्गात तीन वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 07:31 AM2020-03-18T07:31:20+5:302020-03-18T07:31:57+5:30
कोरोनाबाबत अफवा वा खोटी माहिती तोंडी, लेखी, समाज माध्यमांचा वापर करून पसरवीत असल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.
सिंधुदुर्गनगरी : खातरजमा न करता व माहिती न घेता कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे वृत्त प्रसारित करणाऱ्या तीन सोशल मीडिया न्यूज चॅनलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोनाबाबत अफवा वा खोटी माहिती तोंडी, लेखी, समाज माध्यमांचा वापर करून पसरवीत असल्यास तो कायद्याने गुन्हा आहे.
जिल्ह्यातील तीन न्यूज चॅनल्सनी कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात असल्याबाबत खोटी माहिती प्रसारित केली ही बाब अत्यंत गंभीर असल्याने तसेच कोरोनाबाबत अफवा व चुकीच्या वृत्तांना आळा घालण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधीत तीन न्यूज चॅनल्सवर कारवाईचे आदेश दिले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २00५ चे कलम ५४, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या अनुषंगाने शासनाने जाहीर केलेली अधिसूचना व भारतीय दंड विधान संहिता कायदा १८६0 च्या कलम १८८ व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या न्यूज चॅनेल्सवर गुन्हे दाखल करणे सुरू आहे.