corona in sindhudurg-वायंगणी येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:36 PM2020-05-09T17:36:57+5:302020-05-09T17:39:48+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वच्या सर्व 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सापडलेल्या तिसऱ्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वच्या सर्व 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर चौथ्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वच्या सर्व 7 व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर व्यक्तींचे अहवाल येणे प्रलंबित आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी परिसरामध्ये कोरना बाधीत रुग्ण सापडला होता. या परिसराच्या 3 किलोमीटरच्या क्षेत्रातत कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून याठिकाणी नागरिकांचे सक्रिय सर्वेक्षण करण्यात आले आहे.
एकूण पाच गावांमध्ये राबवण्यात आलेल्या या सर्वेमध्ये 23 सेक्टर तयार करून 23 पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 1178 घरांमधील 4886 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणामध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृष्य लक्षणे आढळून आली नाहीत. एकूण 2443 पुरुष व 2533 स्त्रियांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण 759 व्यक्ती अलगीकरणात असून 485 व्यक्तींना गृह अलगीकरणात तर 274 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 708 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 671 रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 4 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 667 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 37 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण 61 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4696 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.जास्तीत जास्त जिल्हावासियांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. तसेच वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन ओपीडी व प्राथमिक उपचाराबाबतचे मार्गदर्शन घ्यावे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर जिल्ह्यातून व परराज्यातून येऊ इच्छिणारे नागरिका तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परजिल्ह्यात व परराज्यात जाऊ इच्छिणारे नागारिक जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरुन पाठवित आहेत.
प्राप्त माहितीवरून परजिल्ह्यात व परराज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांकरिता पास देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. परजिल्ह्यात जाणाऱ्या व जिल्ह्यात येणाऱ्या लोकांसाठी एस.टी. बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबतची योग्य ती सर्व व्यवस्था करण्याबाबतचे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिलेत.आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 10 हजार 612 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याविषयी त्यांच्या जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.
राज्याबाहेर जाण्यासाठी 12 हजार 679 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित राज्यात प्रवेश देण्याबाबत त्यांच्या राज्य शासनास कळविण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 986 नागरिक तर जिल्ह्यातून इतर राज्यांमध्ये 1614 नागरिक गेले आहेत.
सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून 17 हजार 288 हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोन मधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविली आहे.
परराज्यातून जिल्ह्यात परतण्यासाठी 1396 व्यक्तींनी नोंद केली आहे.गोवा राज्यातून 962 व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमधून मिळून 532 व्यक्तींना जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आली आहे.