corona virus -जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:28 PM2020-03-21T16:28:29+5:302020-03-21T16:32:04+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.
कुडाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमावबंदी १४४ आदेशाचे उल्लंघन करून आठवडा बाजार भरवून गर्दी केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली आहे.
शुक्रवारी परूळे गावचा आठवडा बाजार असतो. आठवडा बाजार शुक्रवारी ठेवू नये अशा सूचना परूळे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने व्यापाऱ्यांना केल्या होत्या. मात्र, जमावबंदी आदेश असतानाही हा बाजार शुक्रवारी दुकाने थाटून भरविण्यात आला होता. हा बाजार भरविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी निवती पोलिसांनी जात बाजार बंद करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी काही व्यापारी व पोलीस यांची बाचाबाची झाली. निवती पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून यापैकी काहींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या नऊजणापैकी काहीजण स्थानिक तर काहीजण बाहेरील भाजी विक्रेते असल्याची माहिती मिळत आहे.
कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन
वैभववाडी : कोरोना विषाणूच्या माध्यमातून देशावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचा विषाणू १२ तासांपेक्षा अधिक काळ रहात नाही. त्यामुळे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या कर्फ्यू १०० टक्के यशस्वी केला तर कोरोनाविरूध्दची मोठी लढाई आपण जिंकू. त्यामुळे जिल्हावासीयांनी २२ मार्चला सामाजिक प्रगल्भतेचे दर्शन घडवित कर्फ्यू यशस्वी करावा, असे आवाहन डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले आहे.
डॉ. पाताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हावासीयांना आवाहन केले आहे. कोरोना हे देशासमोरील मोठे संकट आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी स्वंयनिर्धार कर्फ्यूची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.