corona virus : मालवण पालिकेच्यावतीने कोरोना स्वॅब तपासणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 02:37 PM2020-09-13T14:37:52+5:302020-09-13T14:39:37+5:30
कोरोनाची वाढती साखळी तोडून मालवण शहर पुन्हा एकदा कोरोनामुक्त करूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
मालवण : शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, व्यापारी यांसह घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून रुग्णांच्या थेट संपर्कातील सर्वच व्यक्तींची स्वॅब तपासणी करावी. कोरोनाची वाढती साखळी तोडून मालवण शहर पुन्हा एकदा कोरोनामुक्त करूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णाला तत्काळ उपचार मिळाले पाहिजेत. कोणत्याही आरोग्य सुविधांची उणीव निर्माण झाल्यास त्या शासन स्तरावरून अथवा पालिका स्तरावरून तत्काळ उपलब्ध करून दिल्या जातील, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
मालवण शहरातील कोरोना स्थिती जाणून घेत आरोग्य व्यवस्थेचा आढावा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतला. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बांधकाम सभापती यतीन खोत, पालिका अभियंता सोनाली हळदणकर उपस्थित होते.
शहरातील ज्या भागात रुग्ण सापडले आहेत त्या परिसरातील सर्व घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी सोमवार १४ सप्टेंबरपासून करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी आरोग्य विभागास दिले आहेत. नागरिकांनीही ताप अथवा अन्य कोणतीही लक्षणे असल्यास त्याबाबत माहिती लपवू नये असे आवाहनही त्यांनी केले.
मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटर येथे सध्या शहर व ग्रामीण असे २० रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तालुक्यातील १०० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांना आवश्यकता भासल्यास मालवण ग्रामीण रुग्णालयात ६ आॅक्सिजन सिलिंडर पुरवठा आहे.
अधिक उपचारासाठी ओरोस येथे स्वतंत्र व्यवस्था असून त्याठिकाणी रुग्णांना नेण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब तपासणीही जलद गतीने होत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा
मालवण पालिकेच्या अल्पबचत सभागृहात स्वतंत्र वातानकुलीत यंत्रणा उभारणी करण्यात येत असून या ठिकाणी कोरोना स्वॅब तपासणी केली जाणार आहे. याठिकाणी काम सुरू असलेल्या यंत्रणेचा आढावा घेत डॉक्टर पाटील यांच्या सूचनेनुसार उभारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी बांधकाम विभागाला दिले. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने काही आवश्यक बदल त्यांनी सुचविले आहेत.
नागरिकांनी पुढे यावे
शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंद सर्व्हे करण्यासाठी आरोग्य व पालिका प्रशासनासोबत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी व सेवाभावी संस्थांनी स्वत:हून पुढाकार घेत पालिकेच्या आपत्कालीन कोरोना योद्धा टीममध्ये सहभागी व्हावे. सर्व सुरक्षा सुविधा पालिकेच्यावतीने दिल्या जातील. तरी इच्छुकांनी स्थानिक नगरसेवक-नगरसेविका व आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.