corona virus : कठोर भूमिका घ्यायला लावू नका, खबरदारी घ्या, नियम पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:05 PM2020-07-27T15:05:22+5:302020-07-27T15:08:36+5:30
ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे.
मालवण : कुडाळ येथील कोरोना बाधित भाजी विक्रेत्याच्या संपर्कात मालवणातील जे भाजी विक्रेते आले असतील त्यांनी माहिती लपवू नये. स्वत:ची आरोग्य तपासणी करून घ्यावी. ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे.
दरम्यान, शहरातील स्थानिक भाजी विक्रेते व मत्स्य विक्रेते या सर्वांची आरोग्य तपासणी पालिकेच्यावतीने लवकरच केली जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, मालवण शहरवासीयांसाठी खरा कसोटीचा काळ सुरू झाला आहे. आजपर्यंत आपले शहर सुरक्षित ठेवण्यास नागरिकांनी प्रशासनाला जसे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही नागरिक देतील यात शंका नाही. मात्र, नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर त्या त्यांनी कराव्यात.
लवकरच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपाययोजनांबाबत बैठक घेऊन निर्णय घ्यायचे असल्याने नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील. मालवण व्यापारी संघानेसुद्धा सर्व व्यापारीवर्गाच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्यावा. मुंबई, पुणे अथवा अन्य जिल्ह्यातून मालवणात प्रवासी घेऊन येणाऱ्या खासगी बस मालकांनीही अधिक काळजी घ्यावी.
येणाऱ्या प्रवाशांची व प्रवासाची पूर्ण माहिती घेऊन त्याची प्रत मालवण ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती येथे द्यावी. शहरातील व्यक्तींची नोंद नगरपालिका तर ग्रामीण भागातील व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत स्तरावर करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घ्यावी. तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा गुन्हे दाखल होतील, असेही ते म्हणाले.
...अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार
शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तींची नोंद व तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन ठेवले जात आहे. क्वारंटाईन नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. अन्यथा त्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातील. दोन दिवसांपूर्वी तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
महेश कांदळगावकर,
नगराध्यक्ष , मालवण .